राजन साळवींसह संजय कदमांवर संघटनात्मक जबाबदारी

माजी आमदार साळवींची धाराशीव तर माजी आमदार कदमांची  सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड

रत्नागिरी:- शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांवर राज्याच्या महत्त्वाच्या जिल्ह्यांची संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे. लांजा – राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांच्याकडे धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची, तर दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

​उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाचे राज्यातील ‘जिल्हा संपर्कप्रमुख’ जाहीर करण्यात आले असून, यात कोकणातील या दोन नेत्यांना संघटना वाढीसाठी राज्याच्या मध्यवर्ती भागातील जिल्ह्यांची जबाबदारी मिळाली आहे.

​या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. ते म्हणाले, “मा. एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पक्षाने माझ्यावर सोपवलेली ही नवीन जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणाने पार पाडेन आणि सोलापूर जिल्ह्यात संघटनेला बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.”

​माजी आमदार राजन साळवी आणि संजय कदम यांना मिळालेल्या या नव्या जबाबदारीमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठे वळण मिळाले आहे. शिवसेना पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून दोन्ही जिल्ह्यांमध्ये संघटना अधिक मजबूत करण्याची मोठी कसरत त्यांना करावी लागणार आहे.