बाळ माने यांचे प्रतिपादन
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरील दुरावस्थेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापूर्वी केलेले आंदोलन राजकीय सुडापोटी नसून जनतेच्या हक्कासाठी होते, असे स्पष्ट करतानाच त्यांनी टीका करणाऱ्या ‘बगलबच्चे’ आणि ‘लाभार्थीं’ना थेट इशारा दिला. “जेवढं तुमचं वय नाही तेवढे दुप्पट पावसाळे मी राजकारणात काढले आहेत, माझ्या नादी लागू नका,” असे ठणकावून त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बाळ माने म्हणाले, “यापूर्वीचे आंदोलन राजकीय हेतूने नव्हते, ते जनतेच्या हक्कासाठी आणि रस्त्यांवरील त्रासासाठी करण्यात आले होते.” आंदोलनानंतर काही ‘बगलबच्चे’ जागे झाले आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये करू लागले. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पक्षाने शांततापूर्ण आंदोलन केले. पण “आमच्या संयमाला कमकुवतपणा समजू नका,” असा इशाराही त्यांनी दिला. “तुम्ही मुजोर झालात तर आम्हाला बोलावेच लागेल,” असे माने यांनी स्पष्ट केले.
नगरपरिषदेच्या कारभारावर टीका करताना माने यांनी रस्त्यांच्या कामांची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली. परिषदेची देणी आणि बनवलेल्या रस्त्यांची टिकाऊ क्षमता जनतेला कळायला हवी. केवळ ‘उद्योग येणार, रोजगार मिळणार’ अशा घोषणा न देता, आजवर किती उद्योग आले आणि किती स्थानिक युवकांना रोजगार मिळाला, याचाही लेखाजोखा सादर करण्याची मागणी त्यांनी केली.
एमआयडीसीच्या कारभारावर बोलताना बाळ माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या ‘ॲडव्हायझर’बद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. “ही नेमणूक रत्नागिरीच्या लोकांचा अपमान आहे,” असे ते म्हणाले. या ऑडिटमुळे काही अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्याचे सांगत, “उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका,” असा सल्ला त्यांनी दिला. चुकीवर आसूड ओढणारच, असेही माने यांनी स्पष्ट केले.
बाळ माने यांनी शेवटी महत्त्वाचे संकेत दिले. “आता दिवाळीचे फटाकेच नाहीत, तर राजकीय फटाकेही मोठ्या प्रमाणात फुटणार आहेत,” असे सांगत त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली.