रस्त्यावर कचरा फेकणारे बेशिस्त रत्नागिरीकर सीसीटीव्हीत कैद

फेसबुक अकाउंटवर; 12 पैकी 4 ठिकाणी सवय जाईना

रत्नागिरी:- बेशिस्त कचरा टाकणार्‍या नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी पालिकेने शहरात 12 सीसीटीव्ही कॅमेरा लावले; मात्र निर्ढावलेले काही शहरातील नागरिक सीसीटीव्हीचा वॉच धुडकावूनही ठिकठिकाणी बेशिस्तपणे कचरा टाकताना कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

कॅमेर्‍याची नजर असतानाही निर्ढावलेल्या नागरिकांकडून बिनधास्त कचरा टाकला जात आहे. 12 कॅमेर्‍यांपैकी पटवर्धन हायस्कूल, झारणीरोड, कोकणनगर, मिरकरवाडा या भागातील काही बेशिस्त नागरिक, महिला कचरा टाकताना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. आरोग्य सभापती, आरोग्य अधिकार्‍यांकडे हे सीसीटीव्ही मोबाईलवर लाइव्ह दिसत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना आगावू सूचना दिली आहे. आता बेशिस्त नागरिकांचे हे फोटो पालिकेच्या फेसबुक पेजवर झळकवण्याचे आदेश आरोग्य सभापती निमेश नायर यांनी आरोग्य अधिकार्‍यांना दिले आहेत.

रत्नागिरी पालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात 12 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पालिकेला स्वच्छतेचा देशपातळीवरील पुरस्कार मिळाल्यानंतर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून रत्नागिरी शहराची ओळख राहावी, यासाठी वारंवार पालिकेकडून प्रयत्न केला जात आहे. शहर कचराकुंडीमुक्त केले आहे. प्रत्येक प्रभागात घंटागाडी सुरू करून घर आणि अपार्टमेंटपर्यंत जाऊन पालिकेचे कर्मचारी कचरा गोळा करत आहेत; मात्र शहरातील काही सुशिक्षित आणि बेशिस्त नागरिक स्वच्छ रत्नागिरीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत.पालिकेने यावर अनेक उपाय केले. कुंड्यांवर वॉचमन ठेवले, वृक्षारोपण केले, सुशोभीकरण केले. आता तर बेशिस्त नागरिकांनी हद्द केली. पालिकेने शहरातील 12 कुंड्यांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावले तरी कचरा टाकतच आहेत.