रत्नागिरी:- गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा व्हावा, त्याचप्रमाणे स्थानिक ग्रामस्थ व चाकरमानी यांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. चाकरमान्यांना रस्त्यात थांबवून कोणतीही टेस्ट केली जाणार नाही. गावात ग्रामकृतीदल तर शहरांमध्ये प्रभागात नेमलेल्या पथकांमार्फत दोन डोस किंवा आरटीपीसीआर नसलेल्या व्यक्तींचीच आरटीपीसीआर किंवा अॅन्टीजेन टेस्ट केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, मागील वर्षीचा गणेशोत्सवानंतरचा अनुभव लक्षात घेता, जिल्हावासिय व चाकरमानी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. चाकरमान्यांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्यांची टेस्ट किंवा डोस झालेले नाहीत. ते रेल्वे स्थानक किंवा गावामध्येही अॅन्टीजेन करुन घेत आहेत. जिल्हावासियांसाठी पुढील दहा दिवस पुन्हा एकदा ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवून सवेंक्षण केले जाणार आहे.
सध्या जिल्ह्यात येणार्या चाकरमान्यांपैर्कीं दोन डोस न घेतलेले व 72 तासापूर्वी कोरोना टेस्टिंग रिपोर्ट न आणणार्या व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात आहे. येणार्या बहुतांश चाकरमान्यांनी डोस घेतलेले आहेत व काहींनी सुरक्षेच्या दृष्टीने टेस्टिंगही केलेले आहे. सध्या गणेशोत्सवासाठी येणार्यांमध्ये 5 ते 7 टक्केच चाकरमान्यांनी टेस्ट किंवा डोस घेतलेले नाहीत. त्यामुळे ग्रामकृती दल किंवा वैद्यकीय पथकाकडून अशांची टेस्ट करुन घेतली जात आहे. येणार्या चाकरमान्यांकडूनही प्रशासनाला सहकार्य मिळत आहे. ज्या चाकरमान्यांना लक्षणे दिसणार आहेत, त्यांची तातडीने अॅन्टीजेन केली जाणार असून उर्वरीतांची आरटीपीसीआर केली जात आहे. पॉझिटिव्ह येणार्यांनाच क्वॉरंटाईन केले जाणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले.
चाकरमान्यांना त्रास देणे हा प्रशासनाचा हेतू नसून, त्यांची व स्थानिक ग्रामस्थांची सुरक्षितता याला महत्व देण्यात येत आहे. यात लोकसहभाग महत्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या कालावधीत नातेवाईक, मित्रमंडळींकडे येणेजाणे होते. त्यावेळी एकमेकांबाबत साशंकता असू नये यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात सध्या पुरेसा अॅन्टीजेन किट व आरटीपीसीआर किटचा पुरेसा साठा असल्याचेही जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले.
एसटी बसमधून येणार्या चाकरमान्यांची माहिती एसटी प्रशासनाने यादीद्वारे संकलित करायची आहे. चालक किंवा वाहकाने दोन याद्या सोबत ठेवत एक यादी चेकपोस्टवर द्यायची व दुसरी यादी आगारप्रमुखांना द्यायची आहे. चेकपोस्टवर गाडी तपासणीसाठी थांबवायची नसून यादी देऊन थेट स्टॅण्ड किंवा गावात सोडायची आहे. एसटी आल्यानंतर किंवा जाताना गर्दी होऊ नये यासाठी प्रयत्न करायचे आहेत. डेपो मॅनेजरने प्रवाशांची यादी नियमिय सायंकाळी पाच वाजेपर्यंत तहसील कार्यालयात सादर करायची आहे. खासगी बसमधून येणार्यांची मात्र चेकपोस्टवर माहिती संकलित केली जात आहे. चारचाकी गाडीतून येणार्यांचे वाहन नंबर, चालकाचे नाव, प्रवासी संख्या व प्रमुख व्यक्तिचे नाव आदी माहिती संकलित केली जात आहे.
रेल्वेने येणार्या प्रवाशांची माहिती रेल्वे प्रशासनाकडून घेतली जात असून, रेल्वेतून उतरल्यानंतर ते गावी जाईपर्यत त्यांचे पर्यवेक्षण केले जाणार आहे. ज्या गावात जाणार आहेत, त्या गावात तपासणी केली जाणार आहे. यासाठी उपजिल्हा भूसंपादन अधिकारी ऐश्वर्या साळुंखे यांची नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकार्यांनी नियुक्ती केली आहे. रेल्वेतून येणार्यांच्या सर्व याद्या एकत्र करुन त्या प्रत्येक तहसीलदारांना दिल्या जाणार असून नंतर ग्रामकमिटीला माहिती कळवली जात आहे. येणार्या चाकरमान्यांकडूनही प्रशासनाला सहकार्य मिळत असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.