ओणी-अणुस्कुरा मार्गावरील रायपाटण खिंडीतील घटना
राजापूर:- तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावरील रायपाटणच्या खिंडीत रात्रीच्या अंधारात अचानक म्हशी आडव्या आल्याने दुचाकीचा अपघात होऊन दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. रामदास गांगण व सुहास गांगण (दोघे रा. रायपाटण) अशी जखमींची नावे असून या अपघातात दोघांच्याही हाताची हाडे फ्रैक्चर झाली असून त्यांच्यावर सिंधुदुर्ग-पडवे येथील दवाखान्यात उपचार – सुरू आहेत. या अपघातामुळे मोकाट गुरांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान रामदास गांगण आणि – सुहास गांगण हे दोघे दुचाकीवरून ओणी-अणुस्कुरा मार्गाने जात होते. रायपाटणच्या खिंडीत रस्त्यावर अचानक अनेक म्हशी आडव्या आल्याने त्यांना काही कळायच्या आतच दुचाकीवर नियंत्रण मिळवता रस्त्यावर आले नाही आणि त्यांचा अपघात झाला. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या हाताची हाडे फॅक्चर झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक युवकांनी तात्काळ धाव घेतली. समीर खानविलकर, मया गांगण, सुशांत गांगण, विशाल गांगण आणि तुषार गांगण या युवकांनी कोणतीही वेळ न दवडता जखमींना तत्काळ उपचारासाठी सिंधुदुर्ग येथील पडवे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यामुळे दोघांवर त्वरित उपचार सुरू होऊ शकले. या मार्गावर आणि अन्य ठिकाणीही मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे लहान-मोठे अपघात सातत्याने होत असून जीवित व वित्तहानी होत आहे. मोकाट गुरांना आवर घालण्याबाबत वारंवार जनजागृती होऊन अपघाताच्या घटना समोर येऊनही प्रशासन यावर कोणतीही ठोस भूमिका का घेत नाही, असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. रायपाटण खिंडीतील या अपघातामुळे दोन व्यक्तींना मोठी दुखापत झाली आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला. मात्र रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांवर त्वरित उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठे अपघात होऊन मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.









