रत्नागिरी:- जिल्हा परिषदने रस्ते दुरूस्तीसाठी तिस कोटी रुपयांची मागणी केली होती; मात्र शासनाने फक्त १ कोटी ९ लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे हा निधी नऊ तालुक्यात कसा वर्ग करायचा असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.
यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. यामुळे जिल्हा परिषदच्या रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळणच झाली आहे. खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहनचालकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जवळपास अडीच हजार कि.मी.चे रस्ते खराब झाले आहेत. यासाठी जि.प. प्रशासनाने ३० कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केली होती. मात्र फक्त १ कोटी ९ लाख रुपये खड्डे भरण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेला दिले आहेत. हा निधी ९ तालुक्यांना वर्ग करावा लागणार आहे. ३० कोटी मागितले असताना त्यातील फक्त १ कोटीच दिल्याने हा निधी वितरित कसा व कुठल्या तालुक्याला किती द्यायचा असा प्रश्न उभा आहे. सध्या रस्त्यांची अवस्था फारच बिकट बनली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवरून चालणेही कठीण होवून बसले आहे. किमान १५ ते २० कोटी रुपये मिळतील तेव्हा या खड्ड्यांची डागडूजी योग्य होईल.