रनप मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी येत्या 21 डिसेंबर रोजी पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर शहरात होणारी संभाव्य गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून या दिवशी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत.

मतमोजणीच्या वेळी उमेदवार, राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.दि.21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जेलनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय गेट नंबर 2 कडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून, प्रवाशांना जेलनाका- लाला कॉम्प्लेक्स- गीता भवन- जयस्तंभ या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. हे निर्बंध पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि शासकीय दौऱ्यावरील वाहनांना लागू राहणार नाहीत. तसेच, अत्यावश्यक प्रसंगी घटनास्थळी तैनात असलेले पोलीस अधिकारी परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेऊ शकतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या तात्पुरत्या स्वरूपातील वाहतूक बदलाबाबत कोणाही नागरिक किंवा वाहनचालकाला काही आक्षेप असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे आपली हरकत नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मतमोजणीच्या दिवशी नागरिकांनी सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, जेणेकरून शहरात वाहतुकीचा खोळंबा होणार नाही.