रत्नागिरी:- जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसतानाही रत्नागिरी नगर परिषद पोटनिवडणुकीत २०१५ साली विजयी उमेदवाराची मिरवणूक काढल्याप्रकरणी १८ जणांना न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. प्रत्येकी दोन हजार रुपये दंड असे या शिक्षेचे स्वरूप आहे. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसतानाही मिरवणूक काढल्याचा आरोप उमेदवारासह १८ जणांवर ठेवण्यात आला होता. शहर पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होते.
रत्नागिरी प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी माणिकराव सातव यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाकडून ॲड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. खटल्यातील माहितीनुसार २०१५ साली नगरपरिषदेच्या राजीवडा प्रभागामध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यावेळी विजयी झालेल्या उमेदवाराने विनापरवाना वाद्य व वाहनांसह राजीवडा पूल – शिवखोल- राजीवडा मच्छिमार्केट मार्गे आदमपूर घूल अशी मिरवणूक काढली होती. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसताना ही मिरवणूक काढण्यात आल्याने शहर पोलिसांकडून याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींविरूद्ध भादवि कलम ३४१, १८८ सह ३४, मुंबई पोलीस अॅक्ट कायदा कलम ३६ (ख),(ड), १३४, ११०, ११७ तसेच डिजे वाजविल्याप्रकरणी पर्यावरण कायदा कलम १९८६ ते १५ (१) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचा तपास शहर पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांनी तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले. न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली. तत्कानील नगरसेविका रुबीना मालवणकर (३३, रा. शिवखोल), मुनज्जा वस्ता (३६, रा. राजीवडा), सईद पावसकर (५०), आझाद कातळकर (४६), शब्बीर. भाटकर (५९),
सैफअली पावसकर (२०), करामत वस्ता (४०), शेख हुश्ये (७५, सर्व रा. राजिवडा), राजेश भिसे (३५), स्वप्नील शिंदे (२८), किरण खेडेकर (३४) अवधूत आंबेकर (३२, सर्व रा. तांबट आळी) सूरज गहेकोज (रा. गाडीतळ), प्रीतम पोतदार (३०, धनजीनाका), अभिषेक (वय २८, रा. मांडवी-रत्नागिरी) असे शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. न्यायालयापुढे पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल दुर्वास सावंत यांनी काम पाहिले.