कचरा डेपोची पुन्हा एकदा पाहणी करून कारवाईबाबत अंतिम प्रस्ताव करणार तयार
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिकेचा घनकचरा प्रकल्प बारगळला आहे. अशातच शहरातील शेकडो टन कचऱ्यामुळे साळवीस्टॉप परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रत्नागिरी पालिकेला वारंवार नोटीस बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आता रत्नागिरी नगरपालिकेवर ठोस कडक कारवाई करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने हालचाली सुरू केल्या असून कचरा डेपोची पुन्हा एकदा पाहणी करून कारवाईबाबत अंतिम प्रस्ताव प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यात पालिकेवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी पालिका घनकचरा प्रकल्प उभारत आहे. परंतु अद्याप पालिकेला मुहुर्त सापडलेला नाही. तत्कालीन नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांनी दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प उभारण्याची तयारी केली होती. स्थानिकांनी त्याला विरोध करून न्यायालयात धाव घेतली होती. तब्बल दहा ते पंधरा वर्षे न्यायालयीन लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना पालिकेला घनकचरा प्रकल्प उभारण्याला विरोध केला नव्हता. त्यामुळे पालिकेने पुन्हा एकदा तेथे प्रकल्प उभारण्याची तयारी केली होती. परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे पालिकेने हा आपला निर्णय रद्द केला.
पालिकेमार्फत सध्या साळवीस्टॉप येथे पाण्याच्या टाकीजवळ कचरा डेपो तयार केला आहे. या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. दुर्गंधीमुळे त्या भागातील नागरिकांना तेथे राहणे कठीण झाले आहे. तर कचऱ्याला आग लागल्यामुळे धुराचे साम्राज्य परिसरात पसरते.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने रत्नागिरी पालिकेला यापूर्वी शेकडो नोटीसा पाठविल्या आहेत. परंतु कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत कोणतीच उपाययोजना पालिकेने अद्यापपर्यंत केलेली नाही. तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसालाही केराची टोपली दाखवली आहे.
नोटीसा देऊन थकलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी पालिकेवर कारवाई करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर रत्नागिरी पालिका कारवाईच्या कचाट्यात सापडणार आहे.