जुलैमध्ये वॉर्डची आरक्षणनिहाय रचना जाहीर होणार
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल मे अखेरमध्ये वाजण्याची शक्यता आहे. यावेळी ३२ वॉर्ड होण्याची शक्यता असून वॉर्ड क्र. १ व वॉर्ड क्र. २ हे मागासवर्गीय आरक्षित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेकांचे पत्ते कट होणार असून जुलैमध्ये ३२ वॉर्डची आरक्षणनिहाय रचना जाहीर होणार आहे.गेले वर्षभर कोरोनामुळे अनेक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. मात्र यापुढे निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, असा निर्वाळा न्यायालयाने दिल्याने जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल मे मध्ये वाजण्याची शक्यता आहे. आतापासूनच रत्नागिरी नगर परिषदेत हालचाली सुरू झाल्या आहेत. यावेळी आरक्षण अनेकांचा घात करणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे काहींनी सेफ वॉर्ड शोधण्यास सुरूवात केली आहे.
सध्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक प्रक्रिया यापूर्वी झाली. मात्र शासनाने प्रभाग रचना रद्द केल्याने पूर्वीप्रमाणे छोटे वॉर्ड करून निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.यावेळी ४ वॉर्ड वाढण्याची शक्यता आहे. एकूण ३२ वॉर्ड रत्नागिरी नगर परिषद हद्दीत होतील, असा अंदाज नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी व्यक्त केला.३२ वॉर्ड झाल्यास शासनाच्या आरक्षणा धोरणानुसार महिलांना ५० टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे ३२ वॉर्डपैकी १६ वॉर्डमध्ये महिलाराज पहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच १६ महिला नगरसेवक रत्नागिरी नगर परिषदेत प्रवेश करणार आहेत.डिसेंबर २०२१ मध्ये नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यासाठी मे २०२१ मध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे तर जूनअखेर अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात वॉर्डनुसार आरक्षण काढले जाणार आहे. यावेळी ४ वॉर्ड वाढणार असल्याने मागासवर्गीय आरक्षण नेमकं कोणत्या वॉर्डमध्ये पडणार याबाबत अंदाज बांधण्याचे काम काही नगरसेवकांनी सुरू केले आहेत.वॉर्डची रचना कशी असावी व वॉर्ड रचना कशी करावी याचे सर्वस्वी अधिकार रत्नागिरी नगर परिषदेला राहणार असल्याने काही वॉर्डच्या रचना बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच काही वाड्या या वॉर्डमधून त्या वॉर्डमध्ये जाण्याची शक्यतादेखील असल्याचे बोलले जात आहे.