रनपच्या सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर ताशेरे 

सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांची खरडपट्टी 

रत्नागिरी:- पालिकेच्या सेतू कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पाढा नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत वाचला. संबंधित महिला कर्मचाऱ्यांना बोलावून नगराध्यक्ष आणि सभागृहाने चांगलेच धारेवर धरले. तुम्ही जेवणाची वेळ एवढी काटेकोर पाळून पाणीपट्टी भरण्यासाठी आलेल्या वयोवृद्धेला मागे पाठवता हे योग्य आहे का. आम्हालाही नियमांवर बोट ठेवावे लागले. आपण जनतेच्या सेवेसाठी बसलो आहोत, जरा वेळ इकडे तिकडे झाली म्हणजे फार मोठा फरक पडत नाही. यापुढे एकही व्यकी मागे जाता कामा नये.
नागरिकांना जन्म, मृत्यू दाखल आणि विवाह नोंदीचा दाखल तत्काळ देण्याची व्यवस्था करा, अशा कडक शब्दात नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी सेतूतील महिला कर्मचाऱ्यांना सुनावले.    

सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक विकास पाटील यांनी थेट या विषयाला हात घातला. ते म्हणाले, कोरोण काळानंतर अजूनही पाणीपट्टी आणि घरपट्टीची वसुलीवर त्याचा परिणाम दिसत आहे. मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. मात्र काल सेतूमध्ये वेगळेच चित्र पहायला मिळाले. एक वयोवृद्ध महिला लसीकरणासाठी पालिकेत आली होती. हातो हात घरपट्टी भरून जाण्याच्या उद्देशाने ती सेतूमध्ये गेली. मात्र तेथील सावंत नामक महिला कर्मचाऱ्यांनी तिची घरपट्टी भरुन घेतली नाही. जेवणाची वेळ झाली होती, मान्य आहे, मात्र एक पावती केल्यामुळे फारसा फरक पडणार नव्हता. ती महिला विनंती करत होती, लसीकरणामुळे मला जरा उशिर झाला. मी देखील त्यांना विनंती केली तरी त्यांनी एकले नाही. सेतूचा काऱभार मनमानी आणि कोणाचेही नियंत्रण नसणार आहे. यामध्ये तत्काळ सुधारणा करावी. यावर नगराध्यक्ष म्हणाले, मलाही याबाबत वाईट अनुभव आला होता. विवाह नोंदणीचा एक विषय होता. त्या व्यक्तीकडे त्याची छायांकित प्रत होती. मात्र पालिकेकडुन त्याला डुप्लीकेट प्रत देण्यासाठी अनेक फेऱ्या माऱाव्या लागल्या. मी त्यामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर ती प्रत मिळाली. सेतूतील काही महिला, कर्मचारी चांगले काम करीत आहे. मात्र अशी उद्दट वागणुक देणाऱ्या कर्मचाऱ्याला ताकीद दिली पाहिजे. संबंधित महिलेला सभागृहात बोलवून घ्या.  

महिला सभागृहात आल्यानंतर नगराध्यक्ष साळवी म्हणाले, तुम्ही परवा घरपट्टी भरण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध महिलेला परत का पाठवले. जेवणाच्या वेळ जरा मागे-पुढे होऊन चालली नसती का, हे योग्य नाही. पालिकेल पैसे देण्यासाठी ती महिला आली होती. तुम्ही वेळा एवढ्या पाळणार असाल तर आम्ही नियमावर बोट ठेऊन. यावर संबंधित महिला म्हणाले, जेवणाची वेळ झाली होती, प्रत्येकवेळी आम्हाला टार्गेट केले जाते हे बरोबर नाही, असे स्पष्ट करीत त्या रडु लागल्या.  यावरून भाजपचे नगरसेवक राजू तोडणकर म्हणाले, मॅडम तुम्ही सभागृहात आहात.  
बोलताना आपण काय बोलते ते बघा. रडल्याने हा प्रश्न सुटणार आहे का. नगराध्यक्ष म्हणाले, पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सेतूच्या सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना नागरिकांशी कसे सौजन्याने वागावे. सेवा कशी द्यावी, याबाबत मार्गदर्शन करा. नागरिकांनी जन्म, मृत्यू , विवाह नोंदणी याचे दाखले तत्काळ देण्याची व्यवस्था करा. तसा फलक लावा, असे नगराध्यक्ष साळवी यांनी सांगितेल.