रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या विषय समिती सभापती आणि स्थायी समिती सदस्यांची निवडणूक मंगळवारी अत्यंत उत्साहात पार पडली. अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीने सर्व पदे आपल्याकडे राखत नगर परिषदेतील आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या निवडींमध्ये जुन्या अनुभवाला सन्मान आणि नव्या रक्ताला संधी देत पालकमंत्र्यांनी राजकीय समतोल साधला आहे.
मंगळवारी झालेल्या विशेष सभेत या सर्व विषय समित्यांची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. त्यावेळी खालील नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वात जास्त उत्सुकता असलेल्या स्थायी समितीसाठी अखेर ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या नगरसेवकांच्या अनुभवावर विश्वास दाखवण्यात आला आहे. या समितीवर नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे (सभापती), तर सदस्य म्हणून उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, निमेश नायर, संतोष उर्फ बंटी कीर, राकेश नागवेकर, प्रिती सुर्वे, सुहेल साखरकर, मानसी करमरकर, दत्तात्रय साळवी, स्मितल पावसकर यां समावेश आहे.
निवडणूक जाहीर झाल्यापासूनच उदय सामंत कोणाच्या गळ्यात माळ घालणार, याची चर्चा होती. आजच्या निवडींमधून त्यांनी पुन्हा एकदा शहरातील विकासकामांचा वेग वाढवण्यासाठी अत्यंत कार्यक्षम टीम निवडल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे. महायुतीच्या सर्व नूतन सभापतींनी ठपालकमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी आणि जनतेचा विश्वास सार्थ ठरवू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
नूतन सभापतींची अधिकृत घोषणा
पाणीपुरवठा समिती: निमेश नायर
बांधकाम समिती: संतोष उर्फ बंटी कीर
स्वच्छता समिती: राकेश नागवेकर
नियोजन आणि विकास समिती: सोहेल साखरकर
महिला व बालकल्याण समिती: प्रीती सुर्वे
शिक्षण समिती: उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर









