रनपची नळपाणी योजना पूर्ण झाल्याचा दावा खोटा; माजी नगरसेवक सोहेल साखरकर यांचा आरोप

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराची सुधारित नळपाणी योजना पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा पूर्णतः खोटा आहे. मिरकरवाडा भागातील 50 टक्के भागात पाईपलाईनच टाकून झालेली नाही. या भागात जुन्या पाईपलाईनवर पाणी पुरवठा सुरू आहे. नव्या पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करून ठेवण्यात आले मात्र सातत्याने पाठपुरावा करूनही पाणी अभियंता भोईर पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप माजी नगरसेवक सोहेल साखरकर आणि संतोष उर्फ बंटी किर यांनी केला आहे. 

 मिरकरवाडा भागात पाण्याचा प्रश्न सातत्याने भेडसावत असतो. शहरात सुधारित पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मिरकरवाडा येथील खडक मोहल्ला आणि वरचा मोहल्ला यासह राम मंदिराच्या पाठीमागील भागात नव्या पाणी योजनेचा एक पाईप देखील टाकून झाला नसल्याचा आरोप सोहेल साखरकर यांनी केला आहे. या भागात पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. खोदकाम करून एक महिन्याच्या कालावधी झाला. केवळ खोदकाम करून ठेकेदाराने पोबारा केला आहे. ठेकेदाराने काम पूर्णत्वासाठी नेमलेले तुषार आणि जमादार नामक सुपरवायझर उडवाउडवीची उत्तर देत असतात. काम पूर्ण व्हावे यासाठी पाणी अभियंता भोईर यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या तरीही अधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत. 

तक्रार केल्यानंतर एखाददुसरा दिवस कामगार हजेरी लावून पुन्हा गायब होतात. या भागातील पाणी योजनेचे काम तात्काळ पूर्ण करा अशा सूचना स्वतः आमदार उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना केल्या. मात्र आमदारांच्या आदेशालाही अधिकारी जुमानत नसल्याचे चित्र आहे. ठेकेदाराकडे संपर्क केल्यास ठेकेदार कामगार नसल्याची कारण पुढे करत आहे असे साखरकर यांनी सांगीतले. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना काय करावे कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न माजी नगरसेवक साखरकर यांनी उपस्थित केला आहे. 

खोदकाम करून ठेवल्याने या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता असून याला सर्वस्वी रनप प्रशासन जबाबदार आहे. मिरकरवाडा येथील नळपाणी योजनेचे अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा येथील नागरिकांसह रनपवर मोर्चा काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे साखरकर म्हणाले.