रनपची दामले शाळा राज्यात भारी; प्रवेशासाठी झळकली गुणवत्ता यादी

रत्नागिरी:- खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेत रत्नागिरीतील पालिकेच्या दामले विद्यालयाने राज्यात सरस कामगिरी केली आहे. या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी गुणवत्ता यादी लावाली लागते. या विद्यालयात पहिलीच्या वर्गाची पटसंख्या १८६ आहे. तर पहिली ते दहावीपर्यंत १ हजार ४७० एवढा पट आहे. शहरी भागामध्ये स्पर्धा असतानाच पालिकेच्या शाळेने शैक्षणिक गुणवत्ता राखली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनीही या विद्यालयाचे कौतुक करीत दामले विद्यालयाचा पॅटर्न राज्यात राबविला जाईल, असे सांगितले.

रत्नागिरी शहरात पालिकेच्या २२ शाळा होत्या; परंतु पटसंख्या कमी होत गेली आणि आठ शाळा बंद पडल्या. आता १४ शाळा सुरू आहेत. सर्व शाळांची मिळून २२०० एवढी पटसंख्या आहे. पालिकेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जाकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टीकोन वेगगेवळा आहे. पैसे भरून अनेक पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत शिकविण्याच्या मानसिकतेत आहेत. पालिकेच्या शाळेत मिळणाऱ्या मोफत शिक्षणाकडे मात्र ते पाठ फिरवतात. त्यामुळे पालिकेच्या शाळांची पटसंख्या घटत आहे. परंतु याला दामले विद्यालयाने छेद दिला आहे. पालिकेची पहिली सेमी इंग्लिश शाळा बनण्याचा मान दामले विद्यालयाने पटकाविला. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे शहरातील उच्चभ्रु पालकांचाही कल या शाळेकडे वळत आहे. या शाळेचा दर्जा वाढत असल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी नवीन इमारतीसाठी १६ कोटी रूपये मंजुर केले आहेत. सध्या पाहिलीची पटसंख्या १८६ झाली असून अजुनही ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळांमध्ये राज्यात दामले विद्यालय शैक्षणिक दृष्ट्या भारी ठरत असल्याचे पालकांकडून सांगितले जात आहे.

दामले शाळेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांना रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे त्या शाळेला आवश्यत ते सहकार्य केले आहे. एक वर्षांमध्ये दामले विद्यालयाची नवी इमारत उभी राहील. पहिलीच्या वर्गाची पटसंख्या १८६ असलेली महाराष्ट्रातील ही एकमेव शाळा आहे.

  • -उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा