रनपकडून शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत स्वतंत्र पाईपलाईन

फ्लोटिंग पंप होणार बंद, वीज पंपांच्या बिलाचा खर्च वाचणार

रत्नागिरी:- शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतची सुमारे
साडेसहाशे मीटरची पाईपलाईन टाकण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. ते पाईप वाहून जाऊ नये यासाठी त्यावर काँक्रिट टाकून मजबूत केले आहे. तसेच दोन दिवसांत नैसर्गिक उताराने येणाऱ्या पाण्याची चाचणीही घेतली जाणार आहे. त्यामुळे लवकरच ६ फ्लोटिंग पंप बंद होऊन गेली २ वर्षे वीज पंपांच्या बिलाचा पालिकेवर पडणारा भुर्दंड थांबणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील फ्लोटिंग पंपाचा विषय चांगलाच गाजत आहे. शिळ जॅकवेल कोसळल्यामुळे शहरातील पाणीप्रश्न निर्माण झाला होता. त्यावर तात्पुरता पर्याय म्हणून ६ फ्लोटिंग पंप बसविले आहेत. सुधारित पाणी योजनेमध्ये शिळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुमारे साडेसहाशे मीटरच्या पाईपलाईनचा समावेश आहे; परंतु दोन झाले तरी ही पाईपलाईन टाकण्याच्यादृष्टीने अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत. आता पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली तर शिळ नदीवरील फ्लोटिंग पंप वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती आणि तसेच झाले. गेल्या वर्षी टाकलेले पाईप पावसामध्ये वाहून गेले. यामध्ये मोठे नुकसान झाले; परंतु या कामामध्ये कोणालाही रस नाही आणि कोणाची मानसिकताही नसल्याने प्रसारमाध्यमांनी हा विषय उचलून धरला तेव्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समज दिल्यानंतर काम हाती घेण्यात आले.

शिळ धरणापासून ते नदीच्या पात्रातून खोदकाम करून ही पाईपलाईन जॅकवेलमध्ये सोडण्यात आली आहे. पावसाळ्यात पाईपलाईन वाहून जाण्याचा अनुभव पाठीशी असल्याने पावसापूर्वी पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्या वाहून जाऊ नयेत यासाठी त्यावर काँक्रिट टाकण्यात आले आहे. त्यामुळे ही पाईपलाईन मजबूत झाली आहे. काम पूर्ण झाल्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये चाचणी घेऊन लवकरच नैसर्गिक उताराने जॅकवेलपर्यंत पाणी येणार आहे. यामुळे नदीतील ६ फ्लोटिंग पंप बंद होऊन वीज बिलाचा आर्थिक भार कमी होणार आहे.