रनपकडून आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांचा सन्मान

रत्नागिरी:- देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये पहिल्या 10 मध्ये येण्याचा मान मिळालेल्या रत्नागिरी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला. या कर्मचार्‍यांनी घेतलेली मेहनत, परिश्रमामुळेच पालिकेला हा मोलाचा बहुमान मिळाला, असे गौरवोद्गार नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी काढले.

स्वच्छता अभियानात रत्नागिरी पालिकेने चांगलीच बाजी मारली. पहिल्यांदा 29 नंतर 23 आणि आता पहिल्या दहा मध्ये येऊन 10 कोटी रुपयांचे पारितोषिक पालिकेने पटकाविले आहे. यासाठी अहोरात्र मेहनत घेणार्‍या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांचे त्यात मोठे योगदान आहे. शहरात स्वच्छतेबाबत चांगली मोहिम पालिकेच्या वतीने राबविण्यात आली. यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना घरोघरी जाऊन स्वच्छतेचे महत्त्वदेखील पटवून दिले होते. शहरातील स्वच्छतेसाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने योग्य ते नियोजन केले होते. त्यामुळेच आज केंद्र सरकारच्या सर्वेक्षणात रत्नागिरी नगर परिषदेने बाजी मारली आहे. यासाठी जिवापाड परिश्रम करणार्‍या कर्मचार्‍यांचा सन्मान नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्य सभापती राजन शेट्ये, निमेष नायर व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष बंड्या साळवी म्हणाले, पालिकेला मिळालेले हे श्रेय आमच्या कर्मचार्‍यांचे आहे. त्यांची मेहनत फळाला आली. आरोग्याबाबत केलेले योग्य नियोजन आणि त्याची केलेली अंमलबावणी यामुळेच आम्ही पहिल्या दहामध्ये येण्याचा मान पटकावला.

शहरात आरोग्याबाबत केलेले नियोजन अणि त्यावर चांगल्या पद्धतीने केलेली कार्यवाही यामुळेच आम्ही हा सन्मान मिळवू शकलो. या मोहिमेत शहरवासियांनीदेखील तितकेच मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे कर्मचारी आणि शहरवासियांचे देखील मी मनापासून आभार मानतो. –राजन शेट्ये,
आरोग्य सभापती रत्नागिरी पालिका.