दोन दिवसात महायुतीचा उमेदवार निश्चित होणार
रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारंसघातील महायुतीच्या उमेदवारीवरून अद्यापही चढाओढ सुरू आहे. उमेदवारी बाबत उद्योजक किरण सामंत यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यातच सोमवारी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या समर्थकांनी चार उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला सुरवात झाली आहे.
शिवसेनेला ही उमेदवारी मिळेल याची खात्री आहे आणि तयारी असावी म्हणून अर्ज घेतले. किरण सामंत अपक्ष लढणार नाहीत किंवा मैत्रीपूर्ण लढतही होणार नाही. महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचे प्रामाणिक काम करण्याचे आदेश आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी दिली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीसाठी पाच दिवस किरण सामंत मुंबईत ठाण मांडून होते. काल त्यांनी नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परंतु या भेटीतून काहीच निष्पन्न झालेले नसल्याचे समजते. त्यामुळे किरण सामंतांच्या समर्थकांकडून आज चार उमेदवारी अर्ज घेण्यात आले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत शिवसेना पक्षाची भूमिका मांडताना जिल्हाप्रमुख राहुल पंडित म्हणाले, लोकसभा निवडणुकीचा महायुतीचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. उमेदवाराबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. परंतु जो महायुतीचे उमेदवर असेल त्याचेच काम करण्याचे आदेश आहेत. त्यात कालावधीही कमी आहे. त्यामुळे सामंत यांचे नाव जाहीर झाल्यास त्यांची तयारी असावी, म्हणून उमेदवारी अर्ज घेण्यात आले. अब की बार ४०० पार, असा नारा आहे. दोन्ही दिवस मुंबईत अनेक बैठका होत आहेत. शिवसेनेला ही जागा मिळाली पाहिजे असा आमचा दावा आहे. आमची तयारी ग्रामीण, शहरी भागातही झाली आहे. उमेदवारी जाहीर व्हायची वाट बघतोय. हा एक तयारीचा भाग आहे. अर्जावर चुका राहू नयेत, यासाठी अर्ज घेतले. अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याबाबतचा हा विषय नाही. शांतपणे पक्षाचे काम सुरू आहे. मैत्रीपूर्ण लढतीचीही शक्यता नाही.









