रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून घमासान

उमेदवारी भरण्याची प्रक्रिया आजपासून

रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. एम. देवेंदर सिंह यांनी जाहीर केली आहे. आज दि.12 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. शासकीय सुट्टीचे दिवस वगळून दि.19 एप्रिलला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. दि.13, 14, 17 एप्रिलला शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यासाठी केवळ पाच-सहा दिवसांचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे. कोकण प्रादेशिक पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री.शकील सावंत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत तथा जीवन देसाई यांच्याकडे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील. प्राप्त अर्जांची छाननी दि.20 एप्रिलला सकाळी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात सुरू होणार आहे. दि.22 एप्रिलला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. लोकसभा निवडणुकीसाठी दि.7 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. निवडणुकीची मतमोजणी दि.4 जून रोजी होणार आहे.

महाविकास आघाडीतर्फे विद्यमान खासदार श्री.विनायक राऊत यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून दि.16 एप्रिलला ते आपला अर्ज दाखल करणार आहेत. कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार श्री.शकील सावंत आज दि.12 एप्रिलला आपला अर्ज दाखल करणार आहेत. मारूतीमंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर रॅली काढून श्री.शकील सावंत आपला अर्ज आज दाखल करणार आहेत. बहुजन विकास आघाडीतर्फे साखरपा येथील श्री.मारूतीकाका जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपा, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवाराचे नाव अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही.

भाजपातर्फे केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणे, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री ना.उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपाने धक्कातंत्र वापरल्यास अधिक उमेदवाराच्या नावात कोणत्याही क्षणी बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भाजपाने रत्नागिरी, लांजा-राजापूर, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात ‘कमळ’ निशाणी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.