रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणांची सुरक्षितता वाऱ्यावर

शासनाच्या मृद, जल संधारण विभागाच्या स्पष्ट आदेशानंतरही अनेक बाबी अपूर्ण

रत्नागिरी:- पावसाळा तोंडावर आलेला असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मृद व जल संधारण विभागाच्या तब्बल २४ धरणांची सुरक्षितता वार्यावर असून या पावसाळ्यात कोणतंही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचे जे उपाय अवलंबणे आवश्यक आहेत त्याबाबत जिल्हा मृद व जलसंधारण अधिकार्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. तिवरे धरणाचा अनुभव रत्नागिरीवासियांच्या गाठीशी असताना एका अधिकार्याच्या उदासीन भूमिकेमुळे धारण क्षेत्रातील जनतेचा जीव संपूर्ण पावसाळाभर टांगणीवर राहणार आहे.

सन २०१९ मध्ये चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण वाहून गेले आणि एकूणच धरणांची सुरक्षितता उघडी पडली. तिवरे धरणाला गळती होती मात्र वेळेवर याची माहिती विभागाला न मिळाल्याने भेंदवाडीतील निष्पाप लोकांनी आपले जीव गमावले. त्यानंतर धरण क्षेत्रात विशेषत्वाने पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घेण्यासाठी शासनाकडून अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले. त्याचाच भाग म्हणून पावसाळ्यादरम्यान तिवरे धरण फुटिच्या घटनेची पुनरवृती होवू नये म्हणून मृद व जलसंधारण विभागांच्या अप्पर आयुक्तांनी विशेष आदेश काढले आहेत. त्यानुसार पूर्ण झालेल्या सर्व लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, गाव तलाव व इतर बांधकामे यांच्या सद्यःस्थितीबाबत तात्काळ पाहणी करून त्याच्या सुस्थितीबाबत व आवश्यक दुरुस्ती बाबत स्वतंत्र आढावा घेऊन अहवाल सादर करावा व आवश्यक उपाययोजना तात्काळ केली जाईल याची दक्षता घ्यावी असे लेखी आदेश दिले आहेत. धरणाच्या जवळ मनुष्यवस्ती असल्यास व भविष्यात धरणास काही धोका उदभवल्यास जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी सर्व संबंधितांना वेळेत सर्व त्या सुचना देण्यात याव्यात. संबंधित प्रकल्प स्थळी आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक दळणवळण व्यवस्था व संपर्क व्यवस्था २४ तास कार्यरत व सुस्थितीत राहील याबाबत ही खातरजमा करावी. यावर्षी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होणार असलेल्या सर्व लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, गाव तलाव व इतर बांधकामे यांची पाहणी करुन सदर ठिकाणी (H.R.) शीर्ष विमोचक व त्याच्या बाजूने तसेच धरणाच्या अन्य भागातून गळती होत असल्यास अशा ठिकाणी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करताना योग्य ती दक्षता घ्यावी व अशा ठिकाणी आवश्यकता असल्यास (H.R.) शीर्ष विमोचकचे द्वार उघडे ठेवण्यात यावे तसेच गळतीचे प्रमाण व धोका मोठ्या प्रमाणात संभवत असल्यास सांडव्यातूनही प्रवाहास अधिकची वाट करून देण्यासाठी सांडवा बांधकाम व आवश्यकतेनुसार वाढीव खोदकाम करून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यात यावी. पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होत असलेल्या लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, गाव तलाव व इतर बांधकामे या ठिकाणी पावसाळा संपेपर्यंत चौकीदार / निरिक्षक २४ तास कार्यरत ठेवण्यात यावेत. खात्यांकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास तातडीची बाब म्हणून बाहय यंत्रणेद्वारे कंत्राटी पध्दतीने 4 महिन्यासाठी योग्य ती कार्यपद्धती व प्रचलित नियमानुसार नियुक्ती करण्यात यावी. आपत्कालीन यंत्रणा कार्यरत करून धरणनिहाय संपर्क अधिका-यांच्या नेमणुका करण्यात याव्यात. आलेल्या तक्रारीची वेळीच योग्य ती तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी. अशा महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

मात्र जिल्हा मृद व जलसंधारण अधिकाऱ्याच्या उदासीन भूमिकेमुळे अद्यापही धरण सुरक्षिततेसाठी आवश्यक अनेक बाबींची पूर्तताच झाली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. केव्हाही मान्सून सुरु होऊ शकतो. कोकणातील पावसाचे प्रमाण आणि स्वरूप पाहता जर वेळेत धरण सुरक्षिततेसाठी वेळीच पावले उचलली नाहीत तर तिवरे धरणासारखी स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. मात्र केवळ सबंधित अधिकार्यामुळे हजारो निष्पाप लोकांचे जीव या पावसाळ्यात टांगणीला लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.