रत्नागिरी, सिंधुदुर्गात बिच शॅक, होम स्टेबाबत स्वतंत्र धोरण

आदित्य ठाकरे; स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याचे प्रयत्न

रत्नागिरी:- गोवा राज्याप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिच शॅक आणि होम स्टेबाबत स्वतंत्र पॉलिसी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यात ही पॉलिसी येईल. कोकणात पर्यटनवृद्धीच्या दृष्टीने त्याचा नक्कीच फायदा होईल, भूमिपुत्रांना रोजगार मिळेल. मुंबईप्रमाणे कोकणातील हे दोन्ही जिल्हे जगप्रसिद्ध व्हावेत या दृष्टीने पर्यटन विभाग आणि शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
गणपतीपुळे येथे नळपाणी योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, निवडणुकीपूर्वी आणि त्यानंतर दिलेली वचने पूर्ण करण्याचे काम महाविकास आघाडीमार्फत करत आहोत. कोकणाला आवश्यक असा शाश्‍वत विकास आम्ही विविध कामांच्या माध्यमातून करत आहोत. सिंधुदुर्गतील चिपीचं विमानतळं पूर्ण केले. रत्नागिरीच्या विमानतळाला शंभर कोटी दिले . ते काम लवकरच सुरू करण्यात येईल. विमानतळ आले की समृद्धी येते, पर्यटन, उद्योग वाढतो. कोकणाचे मुंबईकरांना प्रचंड आकर्षण असते. येथील लाल माती, निळा समुद्र यांसह मिळालेले नैसर्गिक ऐश्‍वर्य कोकणातच आहे. त्याचा उपयोग करून स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी काय करता येईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत. पर्यावरण, पर्यटनासाठी हे दोन जिल्हे महत्त्वाचे आहेत. कोकणात पर्यटनाला वाव आहे, त्यामुळे उद्योग आणू शकतो.

दोन-तीन प्रकल्प येथे येत आहेत. त्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. कुणाला प्रकल्पाची भिती वाटते, प्रदूषणवाढीची शक्यता वाटते तर काहींचा याला पाठिंबा आहे. येथील जिल्हाधिकारी पर्यावरणवादी आहेत. ते नेहमीच पर्यावरणपूरक प्रकल्प कसे राबवता येतील याबाबत संदेश पाठवत असतात,सांगून ठाकरे
म्हणाले,कोकणात जेवढी संधी आहे तेवढेच धोके आहेत. कुणाच्या मुळावर जाऊन म्हणजेच झाड तोडून की झाड वाचून विकास करायचा याबाबत विचार करावा लागेल. पर्यावरण वाचवून विकास करायला पाहिजे. वातावरण बदलामुळे वादळं, पूर येतात, उष्णता वाढते, कधी गारपीट होते. त्यामुळे येथील आंबा, काजू फळ पिके नष्ट होतात. याला जबाबदार आपण सर्वच आहोत. याचा विचार करून पर्यटनाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मशरुम, द्राक्ष कशी काढायची हे अनुभवण्यासाठी भारतीय युरोपात जातात. तेच कोकणात करू शकलो तर तेवढीच समृद्धी मिळणार आहे. सिंधुरत्न योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली तर तर राज्याचा विकास होईल, असा विश्‍वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, पालकमंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील आदी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.


सीआरझेडचे नकाशे तयार करणार

स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्यासाठी तीन महिन्यात गोव्याच्या धर्तीवर बिच शॅक पॉलिसी कोकणात आणली जाईल. सीआरझेडचे नकाशे तयार झाले की, त्याची अंमलबजावणी केली जाईल. कोकणात प्रत्येक घरोघरी पर्यटक येतात आणि राहतात. येथील घरांमध्ये राहण्याची मजा वेगळीच आहे. या धर्तीवर ‘होम स्टे’ पॉलिस राज्यात नव्हती. त्यामुळे विजेचे दर, स्थानिक पातळीवरील कर आकारणीबाबत आळा घालण्यासाठी आणि स्थानिक भूमिपुत्रांना संधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक घराचे हॉटेल होऊ शकते आणि व्यवसायातून रोजगार मिळू शकतो. ही नवीन होम स्टे पॉलिसी लवकरच आणण्यात येणार आहे.

महाविकास आघाडी भक्कम

राज्यातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगला विकास सुरू आहे. महाविकास आघाडी भक्कम आहे. एकत्र असून त्याला कोणताही धोका नाही. तानाजी सावंत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असली तरी तो वैयक्तिक प्रश्न आहे. महाविकास आघाडीचे नेतेमंडळी एकत्र बसून त्यावर तोडगा काढू. जिल्ह्यातील सीआरझेडचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्याला गती का मिळत नाही तो विषय केंद्र शासनाच्या हातातला आहे, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.