१२७ प्राध्यापकांपैकी १४ कामावर,
७० कर्मचाऱ्यांपैकी फक्त ४ उपलब्ध
रत्नागिरी :- रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमधील प्राध्यापकांची कमतरता व सुविधांचा अभाव याचा दंड पुन्हा एकदा आता राज्य शासनाला भरावा लागणार आहे . १० जुलै रोजी राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने दिलेली सुधारण करण्याची मुदत संपली असून अद्याप महाविद्यालयात कोणतीच सुधारणा झालेली नाही . त्यामुळे आता पुन्हा एकदा या वैद्यकीय महाविद्यालयामधील कमतरतेचा भुर्दंड राज्य शासनाला भरावा लागण्याची वेळ आली आहे .
राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने स्वीकारलेल्या धोरणामुळे आता देशभरातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांची पळापळ सुरु झाली आहे . रत्नागिरी बरोबर सिंधुदुर्गातील शासकीय महाविद्यालयात असलेली शिक्षकांची कमतरता व आवश्यक शैक्षणिक सुविधांचा अभाव यात पुढच्या २ महिन्यात सुधारणा करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत . वैद्यकीय परिषदेने सुविधा आणि कमतरतेअभावी भरावा लागणाऱ्या दंडात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयांना सर्वात जास्त म्हणजे १२ लाखांचा दंड ठोठावला आहे . राज्य शासनाने नुकतीच या दंडाची पूर्तता केली आहे . मात्र वैद्यकीय परिषदेने दिलेली सुधारणेची मुदत १० जुलै रोजी संपली तरी अद्याप दोन्ही महाविद्यालयात कोणतीच सुधारणा झालेली नाही .
सध्या रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिले वर्ष संपून वर्षांची अंतिम परीक्षा लवकरच होणार आहे . मात्र अजूनही महाविद्यालयातील आवश्यक १२७ प्राध्यापकांपैकी फक्त १४ प्राध्यापक काम करत आहेत . तर नियमित ७० प्रशासकीय कर्मचाऱ्याऱ्यांपैकी फक्त ४ कर्मचारी उपलब्ध आहेत.
राज्य शासन वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करणार आहे . मात्र महाविद्यालयातील वर्ग १ मधील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक ही पदे भरण्याची प्रक्रिया राज्य शासन स्तरावरुनच करण्यात येणार आहे या पदांसाठी गेले वर्षभर पाठपुरावा करण्यात येत असून अद्याप ही पदे उपलब्ध झालेली नाहीत . तसेच अधिष्ठाता स्तरावर भरण्यात येणाऱ्या सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी प्राध्यापक या पदांसाठी रत्नागिरीत येणाऱ्यांची संख्या कमीच आहे तर याउलट गेले वर्षभर काम करणारे प्राध्यापक गेल्या महिन्यातच राजीनामा देऊन रत्नागिरी सोडून गेल्याचे सांगण्यात आले .