730 कुटुंबांना मिळणार हक्काची घरे, 40 कोटीची निधीची होणार तरतूद
रत्नागिरी:- शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले असून रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी शहर पूर्णपणे झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मंत्रालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत झोपडपट्टीधारकांना कायमस्वरूपी आणि हक्काची घरे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील 730 झोपडपटटी धारकांना ही घरे देण्यात येणार असून यासाठी 40 कोटीचा निधी लागणार आहे.
रत्नागिरी शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे छप्पर मिळावे आणि शहराचे सौंदर्य वाढावे, असा दुहेरी उद्देश या प्रकल्पामागे आहे. या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आणि उपनगराध्यक्ष समीर तीवरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी साधारणपणे तीन एकर जागेची आवश्यकता असून, त्या जागेवर 730 सुसज्ज घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण गृहप्रकल्पासाठी अंदाजे 40 कोटी रुपयांच्या निधीची गरज भासणार आहे. हा भव्य प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचा आधार घेतला जाणार असून, उर्वरित आवश्यक निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या या योजनेमुळे रत्नागिरीतील शेकडो कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. या निर्णयामुळे झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.मंत्रालयात झालेल्या या बैठकीत केवळ धोरणात्मक निर्णयच घेण्यात आले नाहीत, तर प्रकल्पाच्या तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला नगरविकास विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी, म्हाडा आणि गृहनिर्माण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबींची माहिती दिली. पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश दिले असून, यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.
रत्नागिरीच्या इतिहासातील हा एक मोठा गृहनिर्माण प्रकल्प ठरणार असून, यामुळे शहराचे नियोजनबद्ध विकास करण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. झोपडपट्टीमुक्त रत्नागिरीचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी नगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकार आता कामाला लागले आहे.
रत्नागिरीतील 730 झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित आणि सोयीसुविधांनी युक्त अशा घरात राहण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत मोठा सकारात्मक बदल घडून येईल असा विश्वास उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी व्यक्त केला.









