रत्नागिरी शहरात हरवलेली पर्स मूळ मालकाला केली परत

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर परिसरात हरवलेली पर्स त्याच्या मुळ मालकाला शहर पोलिसांकडून सुपूर्द करण्यात आली.

मनीष कांतीलाल जैन (41, रा.जैन कॉलनी शेजारी थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) हे शुक्रवार 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वा.च्या सुमारास आपले नाकोडा ज्वेलर्स हे दुकान उघडण्यासाठी घरातून निघाले. त्यावेळी त्यांच्या हातामध्ये असणार्‍या पर्समध्ये दुकानाच्या चाव्या व सुमारे दहा तोळे सोन्याचे (मंगळसूत्र व बांगड्या) असा मुद्देमाल होता.ही पर्स त्यांच्याकडून कुठेतरी गहाळ झाली म्हणून त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.
तक्रार प्राप्त होताच शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी पोलिस नाईक पंकज पडेलकर यांना पर्सचा शोध घेण्यास सांगितले.पंकज पडेलकर यांनी शहरातील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता ती पर्स विशाल विठ्ठल मालवदे (रा. कोळंबे,रत्नागिरी) उचलताना दिसून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी करुन हरवलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला. पर्स मधील चाव्या व सर्व दागिने मनीष कांतीलाल जैन यांना पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या हस्ते रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे सुखरूप ताब्यात देण्यात आले आहेत.