रत्नागिरी शहरात सहा हजार नळांवर बसले मीटर; जितका वापर तितके येणार बिल 

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील रहिवाशांना आता मुबलक पाणी मिळणार असले तरी त्या पाण्याच्या वापरानुसार बिलाची आकारणी होणार आहे. त्यासाठी नगर परिषद प्रशासनाने शहरात नळजोडण्यांवर पाणीमीटर बसवण्यास सुरूवात केलेली आहे. एकूण 10,530 नळजोडण्यांवर पाणीमीटर बसवण्याचे उद्दीष्ट असून त्यापैकी आतापयंत सुमारे 6 हजार नळजोडण्यांवर पाणीमीटर बसवण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. यामुळे आगामी काळात पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी शहरातील ग्राहकांच्या नळजोडण्यांवर पाणीमीटर बसविण्यात येणार आहेत. ही मीटर बसविण्याची कार्यवाही न.प.पाणीपुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आलेली असल्याचे या विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांनी सांगितले.

रत्नागिरी शहरासाठी सुमारे 72 कोटी रुपये खर्च करून शहरासाठी राबवलेल्या सुधारित पाणीयोजनेचे काम आता पूर्णत्वास गेलेले असल्याचा दावा केला जात आहे मात्र शहरातील मुरूगवाडा, मिरकरवाडा, किल्ला, भगवतीबंदर आदी भागात पाणीजोडण्या करण्यात आलेल्या नाहीत. या भागातील नागरिकांना अजूनही जुन्यापध्दतीनेच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरातील मुरुगवाडा, पंधरामाड येथे गेल्या आठवडयात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात आला होता. एमआयडीसीकडून होणारा हा पाणीपुरवठा हा विजपुरवठा खंडीत झाल्यामुळे होऊ शकला नव्हता.

शहराला पाणीपुरवठा करणार्या जुन्या जलवाहिन्या पूर्ण जीर्ण झाल्या होत्या तर काही ठिकाणी त्यातून पाणीपुरवठा होता पाणी तुंबण्याची समस्या उभी होती. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्था वारंवार कोलमडून जात असे. शिळ धारणामध्ये मुबलत पाणी असूनही नागरिकांना ते मिळायचे नाही. वारंवार फुटणारी जलवाहिनी, गळतीचे प्रमाण 30 टक्केच्या वर अशा नगर परिषदेच्या पाणीयोजनेची वाईट परिस्थिती होती. यात सुधारणा व्हावी, यासाठी गेली चार वर्षे शहरामध्ये सुधारित पाणीयोजना राबवण्याची अंमलबजावणीला पारंभ झाला. या योजनेतून शहरात जलवाहिन्या टाकण्याची कार्यवाही काही ठिकाणी पूर्णत्वास गेल्यामुळे त्या भागात तरी मुबलक पाणी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरवासीयांना यापूर्वीच एक किंवा दोन तास मुबलक पाणीपुरवठा करण्याचा वादा प्रशासनाने यापूर्वीच केलेला आहे. रत्नागिरी शहरात पाणी पुरवठ्याचे 14 झोन आहेत. त्यानुसार शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी व त्यानुसारच पाण्याचे बिल आकारण्यासाठी नगर परिषद पशासनाकडून कार्यवाही हाती घेण्यात आली असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अभियंता अविनाश भोईर यांनी सांगितले. शहरात 1200 हजार नळजोडण्या धारकांची संख्या आहे. नळजोडण्यांवर पाणीपुरवठा नियंत्रणासाठी मीटर बसविण्यात येणार आहेत. ते मीटर बसवण्याची कार्यवाही 50 टक्के पूर्णत्वाकडे गेलेली आहे.