थिबा पॅलेस, आंबेशेत परिसरात हायअलर्ट
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला लागून असलेल्या आणि दाट लोकवस्तीच्या विश्वनगर आणि थिबा पॅलेस परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा उघड झाला आहे. शुक्रवारी, १९ डिसेंबर रोजी रात्री ८:३० च्या सुमारास विश्वनगर येथील नगरपरिषद वसाहतीमध्ये बिबट्याने एका बैलावर हल्ला केल्याची घटना घडली. या थरारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये दहशतीचे सावट आहे. मात्र शहरात बिबट्या दिसूनही त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला पुरते अपयश आल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनगर येथील रहिवासी अमोल सावंत यांच्या मालकीच्या आंब्याच्या बागेत एक बैल बांधलेला होता. रात्री साडेआठच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक बैलावर हल्ला चढवला. बैलाच्या ओरडण्यामुळे आणि आजूबाजूच्या हालचालींमुळे बिबट्याने तेथून पळ काढला, मात्र या हल्ल्यात बैल जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वीच जवळच असलेल्या नरहर वसाहत परिसरातही बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता, त्यानंतर आता थेट पाळीव प्राण्यावर हल्ला झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा आढावा घेतला. बिबट्याचा वावर मानवी वस्तीत वाढल्याने पोलिसांनी थिबा पॅलेस, विश्वनगर आणि आंबेशेत परिसरातील नागरिकांसाठी ‘सतर्कतेचा इशारा’ जारी केला आहे. वन विभागालाही याबाबत पाचारण करण्यात आले असून परिसरात गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.
वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खालील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
थिबा पॅलेस आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी रात्री उशिरा किंवा पहाटे घराबाहेर पडणे टाळावे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी एकटे न जाता समूहाने फिरायला जावे. शक्यतो घराच्या आसपास किंवा सुरक्षित ठिकाणीच व्यायाम करावा. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना घराबाहेर एकटे सोडू नये. घराच्या आजूबाजूला आणि गोठ्यांमध्ये रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश ठेवावा.
बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तातडीने पावले उचलावीत आणि या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.









