रत्नागिरी शहरात आजपासून प्लास्टिक हटाव मोहीम

रत्नागिरी:- शहर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने कंबर कसली आहे. आर्थिक वर्ष अखेरीची कामे संपल्यानंतर, १ एप्रिलपासून संपूर्ण शहरात प्लास्टिकविरोधी मोहिमेची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे यांनी या संदर्भात माहिती दिली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

​शासनाच्या सूचनेनुसार, या मोहिमेत दंडाची रक्कम मोठी ठेवण्यात आली आहे. पहिल्यावेळी प्लास्टिक सापडल्यास पाच हजाराचा दंड ठोठावण्यात येणार आहे. दुसऱ्यावेळी 10 हजार तर तिसऱ्या वेळी 25 हजार दंड आणि 3 महिने कारावास अशी शिक्षा असणार आहे.

नगर परिषदेने बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंची यादी जाहीर केली असून, त्यांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर पूर्णतः बंदी असेल. यामध्ये १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक शीट किंवा कापड. प्लास्टिक व थर्माकोलपासून बनवलेल्या थाळी, कप, ग्लास, वाट्या. प्लास्टिक स्ट्रॉ, चमचे, काटे. थर्माकोलचे सजावट साहित्य. एकवेळ वापराचे प्लास्टिक आणि रॅपिंग साहित्य आदींच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.