रत्नागिरी शहरातील 79 इमारती राहण्यास धोकादायक 

रनपकडून स्थलांतराच्या नाेटिसा

रत्नागिरी:-शहरातील ७९ इमारती, घरे या धोकादायक अवस्थेत उभ्या आहेत. ,पावसाळ्यात या इमारती कोणत्याही क्षणी कोसळू शकतात या पार्श्वभूमीवर संबंधित इमारत मालकांना रनपकडून नोटीस बजावण्यात आली आहे. स्वतःसह शेजारी राहणाऱ्यांच्या जीवाच्या रक्षणासाठी धोकादायक भाग पाडून टाका अशी नोटीस वृत्तपत्राच्या माध्यमातून संबंधित घर मालकांना देण्यात आली आहे. 

मुंबईत झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर रत्नागिरी शहरातील धोकादायक इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक इमारती आजही धोकादायक अवस्थेत उभ्या आहेत. यातील काही इमारतींचा स्ट्रॅक्टरल रिपोर्ट धोकादायक असल्याचा अहवाल येऊन देखील या इमारतींमध्ये काम सुरू आहे. यात छत्रपती शिवाजी स्टेडियम, रनप इमारत, जून भाजी मार्केट, आठवडा बाजार इमारत यासह अनेक इमारतींचा समावेश आहे. 

शहरात 79 इमारती माेडकळीस आल्या असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. नगरपरिषदेने या घरमालकांना स्थलांतरासाठी नाेटिसा बजावल्या आहेत. २८ इमारतींचा काही भाग माेडकळीस आला असून ५१ इमारतींचे बहुतांश बांधकाम धाेकादायक बनले आहे.

यापैकी काही इमारतींमध्ये भाडेकरूच वास्तव्याला असून बहुतांश मालक हे अन्य ठिकाणीच राहतात. भाडेकरू जागा साेडत नाहीत, वर्षानुवर्षे ते तिथेच राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व इमारतींचा सर्व्हे केल्यानंतर  इमारत खाली करण्याची नाेटीस नगरपरिषदेने वृत्तपत्रांतून जाहीर केली आहे. तसेच भाडेकरू, स्वतः च्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक भाग पाडून टाका अशा सूचना रनप प्रशासनाने पेपर नोटीस देऊन केल्या आहेत.