रत्नागिरी शहरातील ५७ सीसीटिव्ही कॅमेरे बनणार पोलिसांचा तिसरा डोळा 

रत्नागिरी/ प्रणील पाटील:- शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच शहरातील  प्रत्येक हलचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील ५७ ठिकाणी पोलीसांनी सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याद्वारे नियंत्रण कक्षातून पोलीस शहरावर नियंत्रण करणार आहेत. जिल्हा नियोजनमधून सुमारे १ कोटी रु. खर्च करुन सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रजास्ताक दिनी याचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.

शहरातील वाढत्या लोकसंख्येसोबतच पर्यटन, नोकरी, व्यावसायाच्या निमित्ताने नियमित शेकडो लोक रत्नागिरीत येतात. त्यातील गुन्हेगारी वृत्तीचे लोक गुन्हा करुन शहरातून गायब होतात. त्यांचा शोध घेणे अनेकवेळा अवघड होते. पोलीसांची गस्त २४ तास सर्वच भागात ठेवणे शक्य नाही अशा वेळी पोलीसांचा तिसरा डोळा म्हणूण सीसीटिव्ही कॅमेरे  आता काम करणार आहेत.

रत्नागिरी शहरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पोलीस उपविभागिय कार्यालयामार्फत पोलीस अधीक्षक  कार्यालयात पाठविण्यात आला होता.त्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी  जिल्हा नियोजन विभागाकडे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी १ कोटी निधीची मागणी केली होती. पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी या निधीला मान्यता दिल्यानंतर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम एका एजन्सीकडे देण्यात आले होते.

सीसीटिव्ही कॅमेरे बसविणारी एजन्सी निश्चित झाल्यानंतर विद्यमान  पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी उत्तमरित्या पाठपुरावा केल्यानंतर सीसीटिव्ही कॅमरे बसविण्याच्या प्रक्रियेला गती प्राप्त झाली होती.नुकतेच सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पुर्णत्वाकडे गेले आहे. शहराच्या शेवटच्या टोकापासून म्हणजे भगवतीमंदिर परिसर, मिरकरवाडा जेटी, भगवती जेटी, अंतर्गत सर्व रस्ते, मांडवी,भाट्ये समुद्र किनारा, मुख्यबाजारपेठ, मुख्या मार्ग, एसटी बस  स्थानक, जयंस्तभ, जिल्हा रुग्णालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जेल नाका, मारुती मंदिर, साळवी स्टॉप, कुवारबाव या भागात सुमारे ५७ कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्याद्वारे पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात सीसीटिव्ही कॅमेेऱ्यांचा कंट्रोल ठेवण्यात आला आहे. तेथून संपुर्ण शहरावर सीसीटिव्ही कॅमेेऱ्या द्वारे पोलीस वॉच ठेवणार आहेत.

सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पुर्ण झाले असून अंतिम चाचणी सुरु आहे. प्रजास्ताक दिनी सीसीटिव्ही कॅमेरे युनिटचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.