रत्नागिरी शहरातील ४८ अनधिकृत, धोकादायक हॉर्डिंग हटवली

रत्नागिरी:- जिल्ह्यातील अनधिकृत, धोकादायक होर्डिंग हटविण्याचे आदेश पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी दिल्यानंतर त्यांची अंमलबजावणी रत्नागिरी नगर पालिकेने सुरु केली आहे. अनधिकृत ४० तर अधिकृत असूनही धोकादायक असलेले २० होर्डिंग काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्यांची अंमलबजाणी सुरु करण्यात आली आहे. सोमवार, मंगळवारी ४८ होर्डिग काढण्यात आली आहेत.

पावसाळ्यात वार्याच्या वाढत्या वेगासोबतच वादळात होर्डिंग कोसळण्याच्या घटना यापुर्वी मुंबई, पुणे या महानगरांमध्ये घडल्या आहेत. या घटनांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा नाहक बळी जातो. याची गंभीर दखल राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी घेतली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मान्सुनपुर्व आढवा बैठकीत ना.सामंत यांनी जिल्ह्यातील सर्व अनधिकृत, धोकादायक होर्डिंग काढण्याचे आदेश दिले होते. चिपळूणनंतर रत्नागिरी नगर पालिकेने होर्डिंग काढण्याची कारवाई सुरु केली आहे.

रत्नागिरी पालिकेने केलेल्या पाहाणीत शहरात एकूण १९० अधिृत होर्डिंग आहेत. त्यातील डब्बल असलेली २० होर्डिंग धोकादायक असल्याचे निश्चित झाले आहे. तर ४० होर्डिंग अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले होते. सोमवारपासून रत्नागिरी पालिकेने अनधिकृत, धोकादायक होर्डिंग काढण्याच्या कामाला सुुरुवात केली आहे. दोन दिवसात ४० अनधिकृत होर्डिंग हटविण्यात आली आहेत. तर अधिकृत असलेल्या एकूण १९० पैकी २० होर्डिंग काढण्यात येणार असून त्यापैकी ८ होर्डिंग काढण्यात आली आहे.
शहरातील मारुती मंदिर, माळनाका, जयस्तंभ येथे हि कारवाई सुरु करण्यात आली आहे.मोठ्या क्रेनच्या सहाय्याने होर्डिग उतरविली जात आहेत. पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या आदेशाने हि कारवाई केली केली जात आहे.