रत्नागिरी पालिका कठोर ; घरपट्टी, पाणीपट्टीची ३८ टक्के वसुली बाकी
रत्नागिरी:- पालिका प्रशासनाचा घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीवर जोर कायम आहे. घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना दणका देत १९२ इमले सील करण्यात आले आहेत. १४ कोटींपैकी ३८ टक्के वसुली अजून बाकी आहे तर पाणीपट्टी न भरणाऱ्या ३९ जणांची नळजोडणी तोडण्यात आली आहे. ४ कोटी ४८ लाखपैकी ३८ टक्के पाणीपट्टी वसूल होणे बाकी आहे. पालिकेच्या कारवाईविरोधात ३५० नळधारक न्यायालयात गेले आहेत. यापुढे ही कारवाई कायम सुरू राहणार असल्याचे पालिकेने सांगितले.
कोरोना महामारीमध्ये दीड वर्ष गेल्याने पालिकेच्या घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. वसुलीचा टक्का घसरल्याने पालिकेच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे वसुली ९५ टक्केच्या वर जाण्यासाठी पालिका प्रशासनाने जोर धरला आहे. मार्च २०२२ हे आर्थिक वर्ष संपले तरी अजून सुमारे ३९ टक्के पालिकेची वसुली शिल्लक आहे. ती वसूल करण्यासाठी पालिकेने कठोर कारवाई सुरू केली आहे. शहरातील सुमारे २९ हजार ८८ इमलेधारकांकडून १४ कोटी घरपट्टीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत ८ कोटी ७० लाख एवढी वसुली झाली आहे. घरपट्टी थकवणाऱ्यांवर पालिकेने कारवाई करून काही खासगी कंपन्याची कार्यालय, मोबाईल टॉवर, इमले सील करण्यात आले होते. मार्चनंतर ही थकबाकी कायम असल्याने पालिकेने १९२ इमले सील केले आहेत. काहीजण कारवाईनंतर घरपट्टी भरणा करत असल्याने त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली जात आहे. आतपर्यंत ६२ टक्केच घरपट्टी वसुली झाली असून, अजून ३८ टक्के वसुली बाकी आहे.
शहरात साडेदहा हजाराच्यावर नळजोडण्या आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी ४ कोटी ४८ लाख एवढी पाणीपट्टी वसूल होते; मात्र आतापर्यंत २ कोटी ७८ लाख म्हणजे ६२ टक्के पाणीपट्टी वसुली झाली आहे. सुमारे १ कोटी ६७ लाख एवढी पाणीपट्टी वसुली होणे बाकी आहे. त्यासाठी पालिकेने ३९ नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत. कर भरल्यानतंर त्या पुन्हा जोडण्यात आल्या आहेत. यामध्ये काही हॉटेल व्यावसायिक, खासगी कार्यालये आदींचा समावेश आहे तर काही ग्राहक कारवाईच्या विरोधात न्यायालयात गेले आहेत, असे ३५० ग्राहक आहे असून जादा बिल व अन्य काही कारणास्तव ते न्यायालयात गेले आहेत. वसुलीची उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.