उपमुख्यमंत्र्यांकडे ७० कोटी निधीची मागणी
रत्नागिरी:- राज्यस्तरीय तसेच नगरोत्थान वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रत्नागिरी शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, ध्यानसाधना केंद्रासाठी नवीन इमारत, शिवसृष्टी आदी विकासकामे सुरू आहेत. या मंजूर कामांपोटी शासनाकडून सुमारे ७० कोटी रुपये येणे बाकी आहेत. ते न आल्यामुळे त्याचा कामावर परिणाम होत आहे. ही कामे रखडू नयेत यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी नगरविकासमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली आहे.
शहरातील पायाभूत सुविधा भक्कम व्हावी यासाठी शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी सुमारे १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
निधी लवकर मिळावा…
शहरातील विकासकामे निधीअभावी रखडली आहेत. याकडे शासनाने लक्ष देऊन तो उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा शहरवासीयांकडूनही व्यक्त होत आहे. ती कामे सुरू आहेत. मंजूर निधीपैकी पहिल्या टप्प्यात शासनाकडून २७कोटी पालिकेला प्राप्त झाले; परंतु दुसऱ्या टप्प्यातील २७ कोटींची प्रतीक्षाच आहे. पालिकेची जुनी इमारत पूर्ण जीर्ण झाल्यामुळे ती स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरवण्यात आली. पर्याय म्हणून पालिकेच्या जागेमध्ये प्रशस्त नवीन इमारत उभी राहात आहे. इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे; परंतु त्यासाठीचा निधी आलेला नाही. शहरात उभारण्यात येणाऱ्या ध्यानसाधना केंद्रालाही निधीची कमतरता जाणवत आहे. भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीलादेखील निधी मिळालेला नाही. अशा प्रकारे शहरातील अन्य विकासकामांना निधी आलेला नाही. ही कामे पूर्ण होण्यासाठी जवळपास ६० ते ७० कोटी निधीची गरज आहे. त्यासाठी काल रत्नागिरी दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पालकमंत्री उदय सामंत यांनी ७० कोटींच्या निधीची मागणी केली आहे.








