रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील खडप मोहल्ला, पंधरामाड, मुरुगवाडा येथे टाकण्यात आलेली मुख्य जलवाहिनी जलशुद्धीकरण केंद्र ठिकाणच्या पाणी टाक्यांशी जोडायची आहे. या कामासाठी सोमवारी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणी विभागाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी शहरातील नवीन नळपाणी योजनेचे काम आता जवळजवळ पूर्ण होत आले आहे. सुमारे 120 कि.मी. ची अंतर्गत मुख्य जलवाहिनी टाकायची होती. त्यातील पंधरामाड, खडप मोहल्ला, मुरुगवाडा या तीन झोनमधील जलवाहिनी अंथरणे राहिले होते. हे काम आता पूर्ण झाले असून अंथरण्यात आलेली ही जलवाहिनी साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी असलेल्या टाक्यांशी जोडण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी रत्नागिरी शहराचा सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
रत्नागिरी शहरात पाणी पुरवठ्याचे 14 झोन असून त्यातील 11 झोन सुरु झाले आहेत. खडप मोहल्ला, मुरुगवाडा, पंधरामाड येथील तीन झोन मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर कार्यान्वित होणार आहे. या जलवाहिनीने पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतर नवीन पाणी योजनेतील शहराअंतर्गत असलेले काम 100 टक्के पूर्ण होणार आहे. नाचणे जलशुद्धीकरण केंद्र आणि पानवल धरणाकडून येणारी मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या पाणी योजनेचे 100 टक्के काम पूर्ण होणार
आहे.