रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात टॅंकरने पाणी पुरवणाऱ्या ठेकेदारांच्याही विहिरी आटल्याने यंदाच्या उन्हाळ्यात रत्नागिरीकरांना अभूतपूर्व पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
राज्याच्या अन्य भागांप्रमाणे रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. तरीसुद्धा खासगी टँकर किंवा जलस्रोतांद्वारे पाणीपुरवठ्याचा पर्याय उपलब्ध असतो. अशा प्रकारे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालकांच्या स्वतःच्या विहिरी किंवा कुपनलिका असल्याने आहे. पण यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच तेथील पाण्याची पातळी दरवर्षाच्या तुलनेत कमी झाली आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत ही परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. रत्नागिरी शहरात गेली सुमारे ४५ वर्षे हा व्यवसाय करत असलेले पाणीपुरवठादार संतोष कुष्टे यांनी या संदर्भात लोकसत्ताला माहिती देताना सांगितले की, रत्नागिरी शहरात सुमारे २० पाणीपुरवठादार आहेत. त्यांच्याकडून शहराच्या विविध भागांमध्ये उन्हाळ्याचे दोन महिने पाणीपुरवठा केला जातो. हॉटेल व्यवसाय आणि अपार्टमेंटसमध्ये तर ऑक्टोबर-नोव्हेंबरपासूनच टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. एप्रिल-मे महिन्यात ही मागणी आणखी वाढते. आत्तापर्यंत दरवर्षी या काळात आम्ही मागणीनुसार पाणीपुरवठा करत होतो. पण यंदाच्या वर्षी आमच्याकडे असलेल्या विहिरींमध्ये नैसर्गिक पाण्याचा साठा कमी झाला असल्याने आम्ही इच्छा असूनही तशा प्रकारे हवे तितके पाणी देऊ शकणार नाही. कारण दरवर्षी या विहिरींमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असते ती पाणीपातळी आत्ता, मार्चच्या पहिल्या आठवड्यातच गाठली आहे. त्यामुळे मे मध्ये याहून वाईट परिस्थिती असेल, असे स्पष्टपणे दिसत आहे. आम्ही नियमितपणे पुरवठा करतो अशा व्यावसायिक किंवा गृहरचना संस्थांना पाणी देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पण नव्याने कोणालाही तशी खात्री देऊ शकत नाही. त्याचबरोबर या पुरवठ्यातही आम्हाला सुमारे ५०% कपात करावी लागली आहे.
गेल्या मोसमात झालेला कमी पाऊस आणि शहरात मोठ्या प्रमाणात झालेली बांधकामे, बहुमजली इमारतींमुळे पाण्याची मागणी वाढली आहे. नगरपरिषदेची यंत्रणाही या सर्व ठिकाणी पाणी पुरवठा करण्यास अपुरी पडत आहे.
काँक्रिटीकरणामुळे जमिनीमध्ये पाणी मुरण्याची क्षमता अतिशय कमी झाली आह त्यामुळे सर्वत्र भूजल पातळी घटली आहे, असेही कुष्टे यांनी नमूद केले.









