रत्नागिरी शहरातील खड्ड्यांमुळे सेना उबाठा गट आक्रमक

रत्नागिरी:- शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषदेला जागे करण्यासाठी आणि महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शनिवारी मारुती मंदिर सर्कल येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत वाहतुकीने गजबजलेल्या रस्त्यावर चक्का जाम केला. उपनेते बाळ माने यांनी नगर परिषद आणि महायुतीला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, या मुदतीत शहरातील ९५ किलोमीटर रस्त्यांवरील खड्डे न बुजल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, उपशहरप्रमुख प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख किरण तोडणकर, सलील डाफळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

शहरात खड्ड्यांचे मोठे साम्राज्य पसरले असून, अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे लहान-मोठ्या वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीची आणि नगर परिषद प्रशासन व महायुती सरकारच्या उदासीनतेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तसेच निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले, असे माने यांनी सांगितले.

बाळ माने यांनी शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत नागरिकांना या आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शनिवारी सकाळी मोठ्या संख्येने शिवसैनिक भगवे झेंडे आणि मफलर घालून उपस्थित होते. “रस्त्यांवरील खड्डे पडल्याने झालेली दुरावस्था” वाहनधारकांना निदर्शनास आणून देण्यासाठी हे आंदोलन जनतेसाठी असल्याचे बाळ माने यांनी स्पष्ट केले.

या चक्का जाम आंदोलनामुळे सकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी झाली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलन सुरू असताना उपनेते बाळ माने आणि शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्यात आंदोलनावरून काही काळ जोरदार बाचाबाची झाली. “आम्ही लोकशाही मार्गाने जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत आहोत. कायदा सुव्यवस्था बिघडेल अशाप्रकारे पोलीस दहशत दाखवू नका, आम्हाला आंदोलन करू द्या. जर दहशत दाखवून अटक केली, तर आम्हीही दाखवून देऊ,” अशा शब्दात माने यांनी पोलिसांना सुनावले.

शिवसेना (उबाठा) च्या आंदोलनानंतर शिवसेना-भाजप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन १५ दिवसांत खड्डे बुजवण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर बाळ माने यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणेला १५ दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला. “जर १६ व्या दिवशीही शहरातील रस्त्यांवर खड्डे दिसले, तर आम्ही तुमच्या भूलथापांना जुमानणार नाही. त्यासाठी कायदेशीर कारवाई झाली तरी आम्ही तीव्र आंदोलन करू,” असा सज्जड इशारा देत बाळ माने यांनी हे चक्का जाम आंदोलन तूर्तास थांबवत असल्याचे जाहीर केले.