रत्नागिरी:- शिवसेना, भाजपमध्ये श्रेयवादातून गाजत असलेल्या रत्नागिरी विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली आहे. ४०० खातेदारांची सुमारे २७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. याचा निवाडा तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी कोकण आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर संपादन करण्यात आलेल्या जमिनीचा दर निश्चित होईल, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी दिली.
रत्नागिरी तालुक्यातील तिवंडेवाडी परिसरातील सुमारे २७ हेक्टर एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठीची अधिसूचना काही महिन्यांपूर्वीच जाहीर केली. यामध्ये रत्नागिरी विमानतळ येथे डॉप्लर व्हेरी फ्रिक्वेंन्सी ओम्री डायरेक्शनल रेडिओ रेंज (डीव्हीओआर) ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून, विमानतळासाठी आवश्यक पॅरलल टॅक्सी ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहे. येणाऱ्या विमानाला तत्काळ धावपट्टी रिकामी करून देण्यास त्याचा फायदा होणार आहे. संस्थापित नेविगेशनला या उपकरणामुळे विमानांशी हवाई संपर्क साधता येणार आहे. रत्नागिरीत तटरक्षक दलाचा तळ उभारण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा तळ अतिशय महत्वाचा आहे. काही वर्षांपासून त्याचे विस्तारीकरण सुरू आहे. धावट्टीचे काम पूर्ण झाले असले तरी अनेक प्रश्न कायम आहेत; मात्र काही अडचणी अजूनही कायम आहेत. दुसरे विमान आले तरी धावपट्टी रिकामी असणे आवश्यक आहे. म्हणून विमान पार्किंगला मोठी जागा लागणार आहे. त्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी तेथील चव्हाण यांची जमीन करारावर वापरायला घेण्याची मागणी केली होती. त्याची प्रक्रिया सुरू असताना आता जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील तिवंडेवाडी येथील २७ हेक्टर जमीन संपादित करण्याची अधिसूचना जारी केली. बाधित क्षेत्रात निवासी जागांचा अंतर्भाव होत नाही म्हणून बाधित कुटुंबाच्या विस्थापनाचा व पुनर्वसनाचा प्रश्न येथे उद्भवणार नसल्याचे अधिसूचनेमध्ये स्पष्ट केले होते.
याबाबत प्रांताधिकारी सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, रत्नागिरी विमानतळासाठी लागणारी वाढीव २७ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जमिनीचा दर निश्चित करण्यासाठी निवाडा तयार करण्यात आला आहे. १० कोटीपर्यंतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यावरील अधिकार आयुक्तांना असल्याने निवाडा अंतिम मंजुरीसाठी कोकण आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल.