रत्नागिरी:- मत चोरीचा मुद्दा सध्या गाजत असून, रत्नागिरी विधानसभा मतदार संघातही 23 हजार बोगस मतदारांची नोंदणी झाली असून पगारी मतदार तयार करण्याचे हे षढयंत्र असल्याचा आरोप माजी आमदार आणि शिवसेना उबाठाचे उपनेते बाळ माने यांनी केला. ही बोगस नावे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी रद्द करावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे.
माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, प्रसाद सावंत, संजय पुनस्कर, साजीद पावसकर, माजी नगरसेविका रशिदा गोदड, महिला पदाधिकारी पूजा जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना बाळ माने म्हणाले की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण बोगस मतदारांची नावे प्रांताधिकार्यांना दिली होती. परंतु त्यानंतर प्रशासनाने त्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही. देशभर हा विषय चर्चेत असून काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी यावर प्रकाशझोत टाकला आहे. राज्यात अनेक मतदार संघात अशी फुगीर मतदार यादी झालेली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातही 23 हजार बोगस मतदारांची नोंद झालेली आहे. वर्षभरापूर्वी आपण पुराव्यासहीत ही यादी सादर केलेली होती. परंतु ही नावे ना वगळलेली गेली, ना रद्द करण्यात आली. त्यावेळी उबाठाचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, काही विभागप्रमुख हे बेईमान झाले. पक्षात असलेल्या घरभेदींमुळे फार लक्ष ठेवता आले नसल्याचे बाळ माने यांनी सांगितले.
येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या बोगस मतदारांचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे इच्छूक असणार्या सर्वच पक्षाच्या पदाधिकारी व संभाव्य उमेदवारांनीही आपल्या भागातील मतदार यादी पाहून त्याबाबत तक्रार करावी. नाहीतर या उमेदवारांनाही याचा फटका बसू शकतो. प्रशासनानेही बोगस नावे वगळून मतदारांची कायदेशीर नावे ठेवावीत अशी मागणीही त्यांनी केली. नवीन यादी अद्यावत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणीही बाळ माने यांनी केली आहे.
कोकणातही शेतीचे मोठे नुकसान
मराठवाड्याप्रमाणेच कोकणातही जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भात, नाचणी आदी पिकांना याचा फटका बसला आहे. या पिकांचेही पंचनामे करावेत व लवकरातलवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही उपनेते बाळ माने यांनी केली आहे.