रत्नागिरी:- रत्नागिरी विधानसभा मतदार संघावर भगवा फडकवायचा आहे, सर्व शिवसैनिक व पदाधिकार्यांनी आतापासूनच कामाला लागा असे स्पष्ट आदेश शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी रत्नागिरीतील पदाधिकार्यांना मुंबईत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत दिले आहेत. यासाठी लवकरातलवकर एकमताने उमेदवार ठरवा आणि त्याचे मला नाव द्या, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, नवरात्र उत्सवात शिवसेना नेते विनायक राऊत हे रत्नागिरीत येणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेेनेचे सातत्याने वर्चस्व राहले आहे. पालकमंत्री उदय सामंत हे राष्ट्रवादीत असतानाही रत्नागिरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व होते. त्यानंतर शिवसेनेत दाखल झाल्यावर ना. उदय सामंत हे नव्वद हजारहून अधिक मताधिक्क्यांनी विजयी झाले आहेत. ना. सामंत यांनी उध्दव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही शिवसेनेतील प्रमुख पदाधिकारी व ग्रामीण आणि शहरातील शिवसैनिक आजही उध्दव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिला आहे.
शिवसेना उध्दव ठाकरे गटातील पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी सध्या शांतपणे वाटचाल करीत आहेत. मागील दोन-तीन महिन्यात तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख व पदाधिकार्यांनी मतदार संघात फिरुन कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. यात ग्रामीण भागातील शिवसैनिक आपल्या जागी अद्याप ठाम असल्याचे चित्र दिसून आले. सध्या या मतदार संघात पालकमंत्र्यांकडून ग्रामीण जनतेला आपल्याकडे ओढण्यासाठी गावागावात कोट्यवधीच्या विकास कामांचा रतीब ओतला जात आहे. परंतु त्यांच्याविषयी ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या मनातील नाराजी अद्याप कमी झालेली दिसून येत नाही. याबाबतचे अहवाल शिवसेना ठाकरेंच्या पक्षातील पदाधिकार्यांनी वरिष्ठापर्यंत पोहच केले आहेत.
दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील पदाधिकार्यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार राजन साळवी, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी पालकमंत्री रविंद्र माने, माजी आमदार सुभाष बने, सौ. नेहा माने, महिला जिल्हासंघटक सौ. वेधा फडके, रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवा अॅड. सुजित कीर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उध्दव ठाकरे यांनी रत्नागिरीचा ‘गड’ कोणत्याही परिस्थिती आपल्याला जिंकायचा असून, पुन्हा भगवा फडकवायचा आहे. तुम्ही एकत्र बसून उमेदवार ठरवा आणि मला सांगा, अशा सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचा, पदे रिक्त असतील तर ती भरुन टाका, छोट्या छोट्या चुका टाळा असा सल्लाही पदाधिकार्यां दिला.
खा. विनायक राऊत आज रत्नागिरीत
शिवसेनेचे नेते खा. विनायक राऊत हे नवरात्रोत्सवानिमित्ताने बुधवार आज रत्नागिरी विधानसभा मतदार संघात येत आहेत. याठिकाणी ते पदाधिकार्यांसह शिवसैनिकांनाही भेटणार आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असल्याचे क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे यांनी सांगितले.