रत्नागिरी लोकसभेसाठी उमेदवार महायुतीचाच अन् चिन्ह देखील: देवेंद्र फडणवीस

रत्नागिरी:- रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेसाठी उमेदवारीची घोषणा लवकरच होईल. या मतदार संघातून उभा राहणारा उमेदवार हा महायुतीचा असेल आणि त्याचे चिन्ह देखील महायुतीचेच असेल असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा उमेदवाराबाबत असलेला सस्पेन्स आणखी वाढवला.

विविध कामांच्या भूमिपूजनाच्या गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार स्वागत झाले. भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांना आवाहन केल्यानुसार कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार कोण याबाबत प्रचंड सस्पेन्स आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरी आल्यानंतर हा सस्पेन्स दूर होईल असे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचे मत होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी गुगली टाकत हा सस्पेन्स आणखी वाढवला.

पत्रकारांनी उपमुख्यमंत्री नामदार फडणवीस यांना रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण? आणि चिन्ह कोणते? असा प्रश्न विचारला असता ते चटकन म्हणाले, महायुतीचाच उमेदवार लढणार आणि चिन्ह महायुतीचेच असणार. उमेदवार निवडीत होत असलेल्या ‘उशीर’ने मतदारांची उत्सुकता आणखी बळावली आहे. किरण सामंत की रविंद्र चव्हाण की आणखी कोण? याबाबत सस्पेन्स आणखी वाढला आहे.