रत्नागिरी:- धुक्यामुळे जलमार्गातील खडकाचा अंदाज न आल्याने त्यावर आदळून रत्नागिरीतील मासेमारी नौकेला विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) मध्ये जलसमाधी मिळाली. खलाशांनी प्रसंगावधान दाखवत छोड्या डिंगीचा (लहान नौका) आसरा घेतला. तेथुन सहकाऱ्यांना फोन करून मतदतीसाठी बोलावून घेतल्याने नौकेवरील २४ खलाशी सुखरुप आहेत. यामध्ये नौका मालकाचे लाखोचे नुकासान झाले आहे.
मिरकरवाडा येतील शौकत दर्वे यांच्या मालकीची ही बोट आहे. मासेमारी करून ते आज पहाटे परतत होते. धुके असल्याने विजयदुर्ग येथील जलमार्गामध्ये असलेल्या खडकाचा तांडेलला अंदाज आला नाही. नौका आहे त्या वेगात खडकावर आदळल्याने पुढील काहीभाग फुटला आणि समुद्राचे पाणी नौकेमध्ये शिरू लागले. नौकेवर सुमारे २४ खलाशी होते. त्यांनी प्रसंगावधान दाखवून पाणी थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. नौकेत पाणी भरुन ती बुडणार, असा अंदाज आल्यामुळे नौकेबरोबर असलेल्या डिंगीत ते सर्व बसले आणि त्यांनी मदतीसाठी इतर सहकाऱ्यांना फोन केले. त्यांच्या डोळ्यासमोर नौकेमध्ये पाणी शिरून ती बुडत होती.
काही वेळाने मदतीसाठी दुसरी नौका आली. त्यांनी डिंगीत असलेल्या २४ खलाशांना नौकेवर घेऊन त्यांची या प्रसंगातून सुटका केली. सर्व खलाशी सुखरुप आहेत. मात्र नौकेला जलसमाधी मिळाल्याने मालकाचे लाखोचे नुकसान झाले आहे. अन्य नौकांच्या मतदीने ही नौका बाहेर ओढुन किनाऱ्यावर आणण्यात आली आहे. येथील सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाला तशी खबर देण्यात आली आहे.









