पाच वर्षानंतर जिल्हा परिषदेला मिळणार नवीन कारभारी
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या 56 तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी शनिवारी 1 हजार 693 मतदान केंद्रावर रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली. 55.79 टक्के इतके मतदान झाले. दरम्यान, ईव्हीएममशीनचा पेटारा आज सोमवार दि. 9 फेब्रुवारी रोजी उघडणार असून सकाळी 10 वाजल्यापासून त्या- त्या तालुक्यातील शासकीय गोदामात मतमोजणी होणार आहे. विविध तालुक्यात फेऱ्यानिहाय मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी सज्ज जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मंडणगडात दोन तासात तर काही ठिकाणी 5 ते सहा, साडेसहा तासात अंतिम निकाल येणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मागील 15 दिवसांपासून निवडणुकीसाठी प्रचाराचा मोठा धुराळा उडाला. शिवसेनेचा गड सुरक्षित राहण्यासाठी रत्नागिरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह विविध नेत्यांची सभा झाली. जिल्ह्यात महायुती विरूध्द महाविकास आघाडीत काँटे की लढत झाली आहे. घरोघरी, कॉर्नर सभा घेवून प्रचार करण्यात आला. काही ठिकाणी चौरंगी, तिरंगी लढत झालेली आहे. काहीठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे. शनिवारी सकाळी सकाळी 7.30 पासून सायंकाळी 5.30 पर्यंत अत्यंत चुरशीने व शांततेत मतदान झाले. 11 लाख 73 हजार 899 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण 55.79 टक्के इतके मतदान झाले.
एव्हीएम मशीन प्रत्येक तालुक्यातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जि.प., पंचायत समितीच्या 472 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज कळणार असून सकाळी ईव्हीएम मशीनचा पेटारा उघडणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून पोस्टल मतदानाने मतमोजणीस सुरू होईल. एकंदरीत, शिवसेना शिंदे सेनेच्या वतीने आपला गड सुरक्षित ठेवून निवडणुकीचा गुलाल उधळणार की महाविकास आघाडी गणित बिघडवणार कोण होणार रत्नागिरीचा नवा कारभारी हे ईव्हीएम मशीन उघडल्यानंतरच स्पष्ट होईल.









