रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेकडून पत्रकार संरक्षण कायद्याबाबत ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन

रत्नागिरी:- 2 नोव्हेंबर रोजी जागतिक पत्रकार हल्ला विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात आला. जगभर पत्रकारांवर हल्ले होत आहेत, पत्रकारांच्या हत्या होत आहेत आणि माध्यम स्वातंत्र्याची सर्रास गळचेपी असताना कुठेतरी या सर्व बाबींना आळा बसावा पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी रत्नागिरी दौर्‍यावर आलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरी मराठी परिषदेकडून निवेदन देण्यात आले आहे.

मंगळवारी येथील नगर परिषद नूतन इमारत भूमीपूजन समारंभासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौर्‍यावर आले होते. यावेळी मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी जिल्हा यांच्याकडून या पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी व इतर मान्यवर उपस्थित होते.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकार काम करत असतानाही प्रामाणिक काम करणार्‍या पत्रकारांची गळचेपी करण्याचे प्रकार समाजात वाढत आहे, दुर्दैवी बाब म्हणजे काही पत्रकारांच्या हत्या या देशात झाल्या आहेत. अशावेळी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे असतानाही प्रशासन काही अंशी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. प्रसिध्दीसाठी मिडिया हवी मात्र समाजासमोर सत्य कथन केले की, मिडियावर ताशेरे ओढले जातात, धमक्या दिल्या जातात त्यामुळे कुठेतरी सरकारने ही बाब गांभिर्याने घेतली पाहिजे अशी मागणी निवेदनाव्दारे मराठी पत्रकार परिषदेने केली आहे.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य महिला प्रतिनिधी जान्हवी पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण देवरुखकर, माजी अध्यक्ष हेमंत वणजू, कार्याध्यक्ष राजेश शेळके, तालुका अध्यक्ष आनंद तापेकर, सतीश पालकर, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र नाचणकर, प्रशांत पवार, ज्येष्ठ पत्रकार सुनील चव्हाण, प्रसिध्दी प्रमुख जमीर खलफे हे उपस्थित होते. आपण याबाबत पाठपुरावा करु अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.