‘जय श्री राम’ लिहिलेली पाठवली पत्र
रत्नागिरी:- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून भाजपला फटकारलं होतं. ‘काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल’ असं म्हणत पवार यांनी भाजपवर मिश्किल टिपण्णी केली होती. यावरून भाजपने पवारांना प्रत्युत्तरही दिलं होतं. यावरून भारतीय जनता युवा मोर्चाही आक्रमक झाला आहे. शरद पवारांच्या या विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी रत्नागिरीतील भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी शरद पवारांना पत्र लिहिलं आहे.
जय श्री राम लिहलेली दोन हजार पत्र थेट शरद पवार यांना पाठवण्यात आली आहेत. पोस्टाच्या पत्रपेटीत जावून ही पत्र पोस्ट केली. याबाबत बोलताना भाजयुमोचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष संकेत बापट म्हणाले की, ‘राम मंदिर हा हिंदूच्या अस्मितेचा विषय आहे, राम मंदिराचं भूूूमिपूजन होत असल्यानं आनंदाचं वातावरण आहे, अशातच पवार साहेबांनी हे वक्तव्य केलं, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं बापट यावेळी म्हणाले.
“कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे,” असं शरद पवारांनी म्हटलं होते.