रत्नागिरी बाजारपेठेतील कर्नाटकी आंबा विक्री स्थानिक बागायतदारांकडून उघड

रत्नागिरी:- कर्नाटकी आंबा आणून रत्नागिरी बाजारपेठेत हापूस आंबा म्हणून विक्री सुरू आहे. व्यापाऱ्यांकडून सर्वसामान्य ग्राहकांच्या होणार्‍या फसवणूकीचा प्रकार आज (बुधवार) सकाळी रत्नागिरीतील आंबा बागायतदारांनी उघडकिस आणला.

हापूस आंब्याचे पीक यावर्षी अवघे दहा टक्केच आले आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन काही आंबा व्यापारी कर्नाटकतील आंबे आणून हापूसच्या नावाखाली विकत आहेत. कोकणातील हापूस आंब्‍यासारखी गोडी या आंब्‍याला नसली तरी दिसण्यात हापूस सारखाच असल्याने त्याचा फायदा व्यापारी उचलत आहेत.

आज सकाळी आंबा बागायतदारांनी थेट व्यापाऱ्यांना गाठून आंब्याची तपासणी केली. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. बागायतदारांनी हापूस आंब्‍याच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकू नये अशी विनंती केली. व्यापाऱ्यांनी यात बदल न केल्यास बागायतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी आंबा बागायतदारांनी व्यापार्‍यांना दिला. या वेळी बागायतदार संघटनेचे निशांत सावंत, बावा साळवी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बाजारपेठेत काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.