रत्नागिरी:- निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेल्या प्रभाग क्र. १० मध्ये प्रचाराने जोर धरला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. महायुतीकडून या प्रभागातील तिसरी फेरी आहे तसेच महाविकास आघाडीनेही वैयक्तीक भेटींना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरात पुन्हा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.
तांत्रिक बाबींमुळे प्रभाग १० मधील निवडणूक २० रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, १० डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून युती-आघाडीचे उमेदवार आणि पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाले आहेत. महायुतीने प्रभाग १० मध्ये विठ्ठल मंदिर येथून प्रचाराची सुरवात केली. या वेळी महायुतीचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल (ता. ११) पुन्हा त्यांनी प्रचाराला सुरवात केली. महायुतीतील भाजपचे उमेदवार राजू तोडणकर आणि मानसी करमरकर हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून राजाराम रहाटे आणि श्वेता कोरगावकर निवडणूक आखाड्यात आहेत. महायुतीने काल एकत्र येऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्या तुलनेत महाविकास आघाडी प्रचारात पिछाडीवर दिसत आहे. महाविकास आघाडीचे नेते किंवा उमेदवार शक्तीप्रदर्शन करत प्रचार करताना दिसत नाही.
प्रभाग १० हा पारंपरिक भाजपचा आहे. त्यामुळे भाजपने आणि तेथील उमेदवारांनी हा प्रभाग आजही बांधून ठेवला आहे. त्यात एकाच प्रभागात प्रचार करण्याची त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. १ डिसेंबरपूर्वीचे वीस दिवस आणि आताचे पंधरा दिवस प्रचारासाठी मिळाल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे. रत्नागिरी प्रभाग क्र. १० मधील अपक्ष उमेदवार सचिन शिंदे आणि संपदा रसाळ-राणा या दोघांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा न्यायालयाकडूनही अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे या उमेदवारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्याचा निर्णय अद्याप मिळालेला नसल्याने २१ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.









