रत्नागिरी:- रत्नागिरी पोस्टल विभागाने ग्रामीण डाक जीवन विमा योजनेकरिता घेण्यात आलेल्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या महालॉगिन डे ला ग्रामीण डाक जीवन विम्याचा रु 1 कोटी 81 लाखांचा विक्रमी प्रीमियम केवळ एकाच दिवसांत गोळा केला. आजवर झालेल्या कामगिरीशी तुलना करता रत्नागिरी विभागाने केलेली ही कामगिरी ही आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी म्हणून नोंदविली गेली आहे.
या कामगिरीच्या निमित्ताने रत्नागिरी पोस्टल विभागाने 3200 कुटुंबांना विमा संरक्षण दिले असून हे सर्व नवीन ग्राहक पोस्टाच्या हॅप्पी फॅमिलीत समाविष्ट झाले असून लवकरच जिल्हातील सर्वच कुटुंबांना विमा संरक्षित केले जाईल अशी माहिती एन. टी. कुरळपकर अधीक्षक डाकघर रत्नागिरी यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 2 प्रधान डाकघरे 77 उपडाकघरे आणि 584 शाखा डाकघरे असून या सर्व कार्यालयांत विमा पॉलिसीचे हफ्ते भरण्याची सोय तसेच पॉलिसी बाबत अधिक माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. भारतीय डाक विभागाच्या डाक जीवन विमा (पोस्टल लाइफ इन्शुरन्स) व ग्रामीण डाक जीवन विमा (रूरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स) या दोन विमा योजना असून इतर विमा कंपन्याशी तुलना करता आज मितीस सर्वाधिक बोनस दर देणाऱ्या योजना व भरघोस परतावा देणारी एकमेव विमा योजना म्हणून यांचेकडे पाहिले जाते. ही योजना 19 ते 55 या वयोगटातील नागरिकांसाठी उपलब्ध असून या योजनांचे हफ्ते मासिक, त्रैमासिक, सहामाही व वार्षिक याप्रमाणे भरता येतील. तसेच पोस्टाच्या बचत खात्यातून ऑटो डेबिटची (Standing Instruction) सुविधा तसेच आयपीपीबी बँकेच्या ॲप्लिकेशन द्वारे देखील ऑनलाईन भरणे आता सहज शक्य झाले आहे.
रत्नागिरी विभागातील जीवन विम्याचे सर्व कामकाज आता अद्ययावत तंत्रज्ञानाने संगणकीकृत करण्यात आले असून रत्नागिरी व चिपळूण प्रधान डाकघरांमध्ये याकरिता CPC सेक्शन सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्व विमाधारकांना सर्व प्रकारच्या सेवा देणे व मुदत पूर्ण प्रकरणांचे दावे निकाली काढणे अत्यंत सुलभ झाले आहे. यासोबतच ज्या ग्राहकांनी पूर्वी काढलेल्या पॉलिसी बंद पडल्या असतील अशा ग्राहकांनी PLI CPC सेक्शन रत्नागिरी किंवा चिपळूण येथे भेट देऊन बंद पडलेल्या पॉलिसी पुनर्जिवित करून नागरिकांनी आपले भविष्य सुरक्षित करावे असे आवाहन एन. टी. कुरळपकर अधीक्षक डाकघर रत्नागिरी यांनी केले आहे.