रत्नागिरी पालिकेचा टक्का घसरला; ९ वर्षांनंतरही मतदारांत निरुत्साह

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २) केवळ ५५.०९ टक्के मतदान झाले. नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणूक होत असतानाही, मतदारांनी दर्शवलेला हा निरुत्साह प्रशासनासाठी आणि राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. मतदानाचा घसरलेला टक्का मतदारांची बदललेली मानसिकता आणि प्रशासनाचे जनजागृतीचे प्रयत्न अपुरे पडल्याचे स्पष्ट संकेत देत आहे.

​आजवरच्या इतिहासात इतका मोठा काळ (चार वर्षे) रत्नागिरी पालिकेवर प्रशासकीय राजवट नव्हती. त्यामुळे ही निवडणूक एक उत्सव म्हणून पाहिली जात होती; मात्र मंगळवारच्या वातावरणातून उत्साहाचा मागमूसही दिसत नव्हता.

​जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम, पथनाट्ये, घंटागाड्यांवरील आवाहन, रॅली आणि सेल्फी पॉईंट्स यांसारखे अनेक प्रयत्न केले. या प्रयत्नानंतरही नागरिक आपल्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त राहिले. केवळ उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धावपळ दिसत होती, परंतु मतदारांना बाहेर काढण्यासाठी आधीच्या निवडणुकीत दिसून आलेला कार्यकर्त्यांचा उत्साह या वेळी कुठेच जाणवला नाही.​

यापूर्वी विकासकामे आणि उमेदवाराचा स्वच्छ चेहरा या निकषांवर मतदान होत असे; मात्र आता ही बाजू मागे पडत असल्याचे दिसत आहे. राजकारणाची घसरलेली पातळी आणि सततचे आरोप-प्रत्यारोप यामुळे मतदान करण्याची इच्छा होत नाही, अशा प्रतिक्रिया अनेक मतदारांनी व्यक्त केल्या आहेत. मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्यामुळे या बदलाचे गांभीर्य आता राजकीय नेत्यांना समजून घ्यावे लागणार आहे.