रत्नागिरी पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडी बिनविरोध

सभापतीपदी प्रवीण पांचाळ तर उपसभापतीपदी गजानन धनावडे यांची निवड

रत्नागिरी:- शिवसेना-भाजपाची एकहाती सत्ता असलेल्या रत्नागिरी पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे करबुडे गणाचे सदस्य प्रवीण पांचाळ यांची सभापतीपदी तर कुवारबाव गणातून विजयी झालेले गजानन धनावडे यांची उपसभापती निवड जाहीर करण्यात आली.

शिवसेना नेते आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी रात्री जिल्ह्यातील शिवसेनेच्या सभापती आणि उपसभापतींची नावे जाहीर केली. करबुडे गटातून विजयी झालेल्या प्रवीण पांचाळ यांनी पहिल्या सव्वा वर्षासाठी सभापतीपदाची संधी देण्यात आली आहे. शिवसेनेमध्ये गेली अनेक वर्ष समाजकारण करणाऱ्या प्रवीण पांचाळ यांनी करबुडे गटामध्ये स्वत: चांगले मताधिक्क्य घेतानाच, जि.प.च्या निवडणुकीत तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबु म्हाप यांनाही चांगले मताधिक्क्य मिळवून दिले होते. लाजुळ ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही प्रवीण पांचाळ हे चांगले काम करीत होते. करबुडे गणासाठी त्यांच्या रुपाने अनेक वर्षांनी सभापती पद मिळाले आहे. सर्वसामान्य व नम्र कार्यकर्त्यांला पालकमंत्री सामंत यांनी न्याय दिल्याबद्दल कार्यकर्त्यांमधूनही त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

सभापतीपदाप्रमाणेच उपसभापतीपदी निवड झालेले गजानन धनावडे यांनी कधीही पदांची अपेक्षा ठेवली नव्हती. ना. सामंत यांनी तिकीट दिल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांने पक्षासाठी दिलेली जबाबदारी पार पडली. कुवारबाव गणातून विजयी झालेल्या धनावडे यांनी उपसभापती झाल्यावर आपण या पदावर बसू असेही वाटले नव्हते अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत, पालकमंत्री सामंत यांनी गरीब कुटूंबातून आलेल्या कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. सभापती व उपसभापती यांची निवड झाल्यानंतर पालकमंत्री सामंत, आ. किरणभैय्या सामंत, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांचे विशेष आभार मानले.

सोमवारी जिल्हा परिषद आवारातील स्व. शामराव पेजे सभागृहामध्ये पं.स. सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी जीवन देसाई, सहाय्यक म्हणून गटविकास अधिकारी शेळके यांनी काम पाहिले.