रत्नागिरी नगर परिषदेने केल्या १२२ मालमत्ता सील

रत्नागिरी:- शहरामध्ये सुमारे २९ हजार मालमत्ता आहेत. मार्च एंडच्या पार्श्वूमीवर थकीत कर वसुलीसाठी रनपने कठोर पावले उचलली. करबुडव्या नागरिकांना जोरदार दणका देत अनेक मालमत्ता सील तसेच पाण्याची कनेक्शन तोडण्यात आली.

रत्नागिरी नगर परिषदेच्या मालमत्ता कर वसुली पथकाने थकीत १२२ इमले आणि सदनिका सील केल्या. त्याचबरोबर १०८ नळ जोडण्या तोडल्या. चालू आणि थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या ८ वसुली पथकांनी करवसुलीसाठी जोरदार मोहीम राबवली. एकूण १४ कोटी रुपये मागणीपैकी तब्बल ८ कोटी २५ लाख रुपयांची करवसुली झाली असल्याचे वसुली विभागाचे प्रमुख नरेश आखाडे यांनी सांगितले.

मुख्याधिकारी तुषार बाबर यांनीही वसुली पथकासोबत जाऊन थकीत मालमत्ता कर भरण्याची विनंती केली. शहरातील २९ हजार मालमत्ताधारकांपैकी ज्यांचे कर ५ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे होते त्यांच्याकडे वसुलीसाठी पथके जात होती. ८ कोटी २५ लाख रुपयांची करवसुली झाली असून, अनेकांनी धनादेश दिले आहेत ते बँकेत टाकून वटल्यानंतर ही करवसुली रक्कम वाढणार आहे. तथापि अद्यापि ही सुमारे सहा कोटींचा महसूल येणे बाकी असून नगर परिषदने नियमित कर भरणा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.