रत्नागिरी नगर परिषदेत 17 नव्या चेहऱ्यांना संधी

10 माजी नगरसेवकांचा पराभव, 15 माजी नगरसेवकांना संधी

रत्‍नागिरी:- पालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १५ माजी नगरसेवकांना पुन्हा नव्याने काम करण्याची संधी मिळाली असून, १० माजी नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला तसेच १७ नवीन चेहरे सभागृहात येणार आहेत. त्यामध्ये उद्धवसेनेचे ३, भाजप २ तर शिंदे शिवसेनेचे १२ उमेदवार नवीन आहेत.

उद्धव शिवसेनेचे फक्त तीनच उमेदवार निवडून आले असून, ते सर्वच नवीन चेहरे आहेत. त्यात फौजिया तनवीर मुजावर, केतन उमेश शेट्ये, अमित विलणकर यांचा समावेश आहे. केतन शेट्ये यांना राजकीय पार्श्वभूमी असून, त्यांचे वडील उमेश शेट्ये हे माजी नगराध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळालेले सहाही उमेदवार निवडून आले आहेत. त्यात चार माजी नगरसेवक तर २ नवीन चेहरे आहेत. नवीन चेहऱ्यामध्ये नितीन जाधव व वर्षा ढेकणे यांचा समावेश आहे. शिवसेनेचे १२ नवीन उमेदवार निवडून आले असून, त्यामध्ये सौरभ मलुष्टे, पूजा पवार, राजीव कीर, मेधा कुळकर्णी, गणेश भारती, नाहिदा सोलकर, विजय खेडेकर, सायली पाटील, जागृती पिलणकर, आफ्रीन होडेकर, निवेदिता कळंबटे, रूखसार खान यांचा समावेश आहे. महायुतीच्या १५ माजी नगरसेवकांना पुन्हा नव्याने काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामध्ये शिंदे सेनेचे ११ तर भाजपच्या चारजणांचा समावेश आहे. यामध्ये वैभवी खेडेकर, स्मितल पावसकर, निमेश नायर, प्रीती सुर्वे, राजन शेट्ये, श्रद्धा हळदणकर, दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, मानसी करमरकर, राजेश तोडणकर, समीर तिवरेकर, सुप्रिया रसाळ, राकेश नागवेकर, सुहेल साखरकर, संतोष कीर, सुहेल मुकादम यांचा समावेश आहे.

नवख्यांकडून पराभव
नगरपालिकेत निवडणुकीत १० माजी नगरसेवकांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामध्ये सलील डाफळे, उज्ज्वला शेट्ये, रशिदा गोदड, अस्मिता चंवडे, सुशांत चवंडे, भास्कर आंबेकर, नाझनीन हकीम, सईद पावसकर, राजश्री शिवलकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नवख्या उमेदवारांकडून अनुभवी मंडळींना पराभव स्वीकारावा लागला.