कंत्राटी कर्मचाऱ्याची ३ वर्षांत मोठी ‘झेप’, करोडोंची माया जमवल्याची चर्चा!
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या एका कंत्राटी कामगाराची ‘थक्क’ करणाऱ्या प्रगतीची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या ३ ते ४ वर्षांपूर्वी शैक्षणिक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला हा तरुण आज ‘बीएमडब्ल्यू’ दुचाकी आणि आलिशान एसयूव्ही कारमधून फिरत असून, त्याने शहरात फ्लॅट, शेतजमीन आणि दागिन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे समोर येत आहे. रत्नागिरीच्या जनतेच्या कररूपी पैशातून स्वतःच्या संपत्तीचे मनोरे रचणाऱ्या या कथित ‘बंटी-बबली’ जोडीची आता ‘अँटी करप्शन ब्युरो’ कडे चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिक तरुण कंत्राटदार आणि उद्योजकांना जे अनेक वर्षांच्या कष्टाने जमले नाही, ते या कंत्राटी कर्मचाऱ्याने प्रशासकीय राजवटीचा फायदा उठवत अवघ्या काही वर्षांत करून दाखवले. दुसऱ्याच्या नावावर कंत्राटे घेऊन आणि प्रशासनात आपले वजन वापरून त्याने ही माया जमवल्याचा आरोप होत आहे. “आपल्याला दूध पिताना कोणी बघत नाही” अशा अविर्भावात वावरणाऱ्या या महाशयांनी लग्नानंतर सिंगापूरसारख्या परदेश दौऱ्यांवरही लाखो रुपये उडवल्याची माहिती समोर आली आहे.
एकीकडे रत्नागिरी नगर परिषद ३६ कोटींच्या कर्जाखाली दबलेली आहे. पैशांअभावी शहराची साफसफाई करणाऱ्या गरीब कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले जात आहे. मात्र, दुसरीकडे मुख्य अभियंत्यांच्या गैरहजेरीत बांधकाम विभाग हाकणाऱ्या या ‘कंत्राटी’ बहाद्दरावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या इंजिनिअरला पूर्वीच्या नगराध्यक्षांनी त्याच्या गैरवर्तनामुळे कामावरून काढून टाकले होते, परंतु ‘गयावया’ करून तो पुन्हा रुजू झाला आणि पुन्हा आपले रंग दाखवू लागला.
मागील ३ ते ४ वर्षांत शैक्षणिक कर्जातून थेट बीएमडब्ल्यू आणि आलिशान गाड्यांपर्यंतचा प्रवास या कर्मचाऱ्याने केला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात फ्लॅट आणि मोठी शेतजमीन देखील खरेदी केली आहे. मुख्य अभियंत्यांच्या अनुपस्थितीत बांधकाम विभागाचा अनधिकृत ताबा याच कर्मचाऱ्याकडे असल्याने याने याचा पूर्णतः फायदा उचलला. या संपूर्ण गैरप्रकारात पत्नीची खंबीर साथ असल्याने या जोडीला शहरात ‘बंटी-बबली’ म्हणून ओळखले जात असून संबंधित बबली सध्या रजेवरच असल्याची चर्चा आहे.
या प्रकारामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेत प्रचंड संतापाचे वातावरण आहे. “बंटी-बबली जोमात, रत्नागिरीची जनता कोमात” अशी स्थिती निर्माण झाली असून, या दाम्पत्याच्या मालमत्तेची सखोल चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासकीय वरदहस्त असलेल्या या कर्मचाऱ्यावर आता नवनिर्वाचित मंडळ काय कारवाई करणार, की पुन्हा या प्रकरणावर पडदा टाकला जाणार, याकडे संपूर्ण रत्नागिरीचे लक्ष लागले आहे.









